नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:03+5:302021-07-31T04:28:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कठोर परिश्रम घेऊन शासकीय खुर्चीवर बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटाबंदी व संचारबंदीतही पैशांचा मोह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कठोर परिश्रम घेऊन शासकीय खुर्चीवर बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटाबंदी व संचारबंदीतही पैशांचा मोह आवरता आला नसल्याचे एसीबीच्या कारवाईवरून दिसून येत आहे. मागील अडीच वर्षांत एसीबीने २७ जणांना लाच घेताना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे लाचखोरीत शिपायापासून ते अधिकाऱ्यापर्यंतचा समावेश आहे.
शासकीय कार्यालयात काम करताना सर्वसामान्यांकडून कुठल्याची प्रकारची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचारी आर्थिक हव्यासापोटी पैशांची मागणी करतात. अशा कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असतो. या विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार सन २०१९ मध्ये १०, २०२० मध्ये ११, २०२१ जुलैअखेरपर्यंत सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी फुगत चालली आहे.
बॉक्स
पोलीस व महसूल विभाग सर्वांत पुढे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत लाच घेत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी अधिक प्रमाणात आहेत. मागील अडीच वर्षांत सात पोलीस, तर सहा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना लाच घेताना बेड्या ठोकल्या आहेत.
यासह पंचायत समिती, तहसील कार्यालय आदी खात्यांतील बाबूंनासुद्धा लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
बॉक्स
लाच पाचशेपासून ५० हजारांपर्यंत
शासकीय कर्मचारी वा अधिकारी सर्वसामान्यांचे काम करून देण्यासाठी ५०० रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत लाचेची मागणी करीत असल्याचे एसीबीने केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे. यामध्ये साध्या शेतकऱ्यांपासून ते अवैध धंदे करणाऱ्यांकडूनही लाचेची मागणी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
----
गुन्हा टाळण्यासाठी लाच
सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशनमधील एका पोलिसाने थेट सट्टापट्टी घेणाऱ्यावर धाड टाकली होती. यावेळी त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी लाच मागितली होती. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
वर्ष संख्या
२०१९ १०
२०२० ११
२०२१ ०६
----
बहुतेक जण तक्रारी करायला येत नाहीत. त्यामुळे अशा लाचखोराची हिम्मत वाढते. कुणीही बेकायदेशीररीत्या पैशांची मागणी करीत असेल तर त्याची तक्रार करावी. कार्यालयात येणे शक्य नसल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तक्रार करावी. आम्ही स्वत: तपास करून कारवाई करू.
-अविनाश भामरे, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत विभाग, चंद्रपूर