‘ह्यो नवरा नको गं बाई’ म्हटल्याने नवरदेव आल्यापावली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 07:30 AM2022-05-11T07:30:00+5:302022-05-11T07:30:01+5:30

Chandrapur News बँडबाजाच्या पथकात नाचत गाजत नवरदेव लग्नमंडपी आला. परंतु ऐनवेळी भरमंडपात वधू मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले.

Bride says no to marriage; groom return back | ‘ह्यो नवरा नको गं बाई’ म्हटल्याने नवरदेव आल्यापावली परत

‘ह्यो नवरा नको गं बाई’ म्हटल्याने नवरदेव आल्यापावली परत

Next
ठळक मुद्देचिमूर तालुक्यातील कोलारी येथील घटना

अमोद गौरकार

चंद्रपूर : बँडबाजाच्या पथकात नाचत गाजत नवरदेव लग्नमंडपी आला. परंतु ऐनवेळी भरमंडपात वधू मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले. ही घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कोलारी येथे मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

चिमूर तालुक्यातील उसेगाव येथील एका युवकाचे नागपूर येथील एका मुलीसोबत लग्न जुळले. थाटामाटात साक्षगंधही झाले. मुलीच्या आजोळी कोलारी येथे लग्नकार्य उरकायचे असे बैठकीत ठरले. त्यानुसार कोलारी येथे आज लग्न होणार होते. त्यासाठी नवरदेवही उसेगाववरून आपले वऱ्हाडी घेऊन लग्नमंडपी हजर झाला. त्या मंडपात येताना ढोल-ताशाच्या गजरात आणि मित्रमंडळीच्या नाच-गाण्याने नवरदेव सहजीवनाचे स्वप्न रंगवत आनंदाने वधूमंडपी आला. लग्न मुहूर्तावर लावायचे असल्याने नवरी मुलगीही मंडपी आली. आता मंगलाष्टके होणार इतक्यात मंडपातच मुलीला चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यामुळे लगेचच तिला दवाखान्यात नेण्यात आले. दवाखान्यात शुद्धीवर आल्यानंतर मात्र नववधूने लग्नमंडपी जाण्यास नकार दिला आणि मला त्या मुलाशी लग्न करायचंच नाही, असे स्पष्टपणे घरच्या मंडळींना सांगू लागली. बऱ्याच जणांनी व नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नवरी मुलगी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली. अखेर नवरीच्या नातेवाईकांनीकडून मुलीचा लग्नास नकार आहे, असे स्पष्टपणे नवरदेव आणि त्यांच्या वऱ्हाड्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वधूमंडपी तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवऱ्या मुलाने यावर तोडगा काढावा म्हणून तंटामुक्तीकडे अर्ज सादर केला. तंटामुक्तीनेही तातडीची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तंटामुक्तीच्या सभेत मुलीने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने अखेर नवरदेव मुलाला आल्यापावली वरात परत घेऊन जावे लागले.

जेवणावळी आणि आंदण

लग्न कार्य असल्याने वऱ्हाड्यांसाठी स्वयंपाक बनविला होता. परंतु लग्न कार्य होणार नसल्याने जेवण तरी कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला, परंतु अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने अखेर वऱ्हाड्यांनी जेवण केले. गावातील लोकांनी व नातेवाईकांनी मुलीच्या सुखी संसारासाठी आणलेल्या भेटवस्तू नातेवाईकांना परत न्याव्या लागल्या.

Web Title: Bride says no to marriage; groom return back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.