महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पुलाचा स्लॅब दबला
By admin | Published: July 14, 2016 12:55 AM2016-07-14T00:55:00+5:302016-07-14T00:55:00+5:30
महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा बहुचर्चित पोडसा पुलाच्या स्लॅब खाली दबला आहे.
जडवाहतुकीला बंदी : दोन्ही सीमेवर फलक लावणार
गोंडपिपरी : महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा बहुचर्चित पोडसा पुलाच्या स्लॅब खाली दबला आहे. या पुलावरून होणारी जड वाहतूक बघता संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीला तात्पुरती बंदी घातली आहे. बंदीसंदर्भात महाराष्ट्र-तेलंगणातील पोलीस विभागाला सुचना देणार असून पुलाच्या दोन्ही सीमेवर बंदीचे फलक लावणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
सन २०१० च्या महापुरात बहुचर्चित पोडसा पुलाचा एक स्लॅब खाली दबला होता. बांधकाम विभागाने पाहणी करून कंत्राटदाराला दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र कंत्राटदाराने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. गोंडपिपरी तालुक्यात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. त्यात वर्धा नदीवर असलेल्या धरणातील पाणी सोडल्याने नदी काठावरील गावांना पुराचा मोठा फटका बसला. नदी काठावरील शेकडो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली आहे. एकीकडे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला असताना करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पुलही पुराच्या तडाख्याने क्षतिग्रस्त झाला आहे.
सन २०१० पेक्षा पुलाचा स्लॅब मोठ्या फरकाने दबला आहे. पुलावरून दोन राज्यातील प्रवासी वाहतूक, जड वाहतुकीतून दळणवळण सुरू असते. दबलेल्या स्लॅबमुळे संभाव्य धोका लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभाग गोंडपिपरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून जडवाहतुकीला आळा घालण्याच्या सुचना दिल्या आहेत. याबाबत दोन्ही राज्यातील पोलीस ठाण्याला पत्र देवून पुलाच्या दोन्ही सीमेवर बंदीचा फलक लावणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
पुलात जनावरांचे
मृतदेह अडकले
वर्धा नदी फुगुन वाहत आहे. नदीच्या प्रवाहात सापडून मृत पावलेल्या अनेक जनावरांचे शव पोडसा पुलात अडकलेले आहेत. गाय, बैल, म्हैस यासह बकरी, रानडुक्कर यांचे कुजलेले शव पोडसा पुलात पाहायला मिळतात. कुजलेल्या शवांची दुर्गंधी सर्वदूर पसरत आहे.