पुलाअभावी वाढला २५ किलोमीटरचा फेरा
By admin | Published: September 26, 2015 12:51 AM2015-09-26T00:51:44+5:302015-09-26T00:51:44+5:30
तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांना त्रास : भादुर्णी-चिखली मार्गावरील उमा नदीवर पुलाची मागणी
मूल : तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे पूल निर्माण झाल्यास अनेक नागरिकांना सोयीचे ठरू शकते. यासाठी या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामपंचायत भादुर्णीचे माजी सरपंच संतोष रेंगुडवार यांनी केली आहे.
चिखली हे गाव नागपूर महामार्गावर असल्याने चिखली गावातील लोकांना भादुर्णी येथे जायचे असल्यास मूल येथे जाऊन मारोडा मार्गावरुन जावे लागते. हीच स्थिती भादुर्णीवासीयांची आहे. लांब अंतरावरुन गावातील नागरिकांना ये- जा करावे लागते. जेव्हा की अंतर केवळ पाच किमी अंतरावर आहे. मात्र मूलमार्गे गेल्यास २५ ते ३० किमी अंतरावरुन जावे लागते. या ठिकाणी पुलाचे बांधकाम झाल्यास जवळ बंधारा सुद्धा बांधण्यात येऊन शकते. असे झाल्यास शेतीकऱ्यांना सिंचनाची देखील सोय निर्माण होईल. सोमनाथ येथे कृषी विद्यापीठ होणार असल्याने नागपूर मार्गावरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलकडे न येता सरळ भादुर्णी मार्ग सोमनाथला जाण्याची सोयीचे होईल. तसेच कन्हाळगाव हे तीर्थक्षेत्र असल्याने भादुर्णी, मारोडा गावातील नागरिकांना अवघ्या काही अंतरावरुनच सोय उपलब्ध होऊ शकते. यासाठी भादुर्णी-चिखली मार्गावर पुलाचे बांधण्यात करण्यात यावे, अशी मागणी भादुर्णीचे सरपंच संतोष रेंगुडवार यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)