कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आॅटोरिक्षा चालकांचे भविष्य उज्ज्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:43 AM2019-07-26T00:43:52+5:302019-07-26T00:44:41+5:30

विरोधी पक्षाचा आमदार असतानाही आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विधानसभेच्या माध्यामतून संघर्ष केला व नेहमी आॅटोरिक्षा चालकांना साथ दिली. आजही सत्तेत आल्यानंतर आॅटोरिक्षा चालकांच्या कल्याणाचा विचार आम्ही पुढे नेत आहोत. गेल्या अर्थसंकल्पात आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळासाठी दहा कोटी रू. निधीची तरतूद केली.

Bright future for autorickshaw drivers through the welfare board | कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आॅटोरिक्षा चालकांचे भविष्य उज्ज्वल

कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आॅटोरिक्षा चालकांचे भविष्य उज्ज्वल

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आॅटोरिक्षा चालकांना दिले हक्काचे घर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विरोधी पक्षाचा आमदार असतानाही आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विधानसभेच्या माध्यामतून संघर्ष केला व नेहमी आॅटोरिक्षा चालकांना साथ दिली. आजही सत्तेत आल्यानंतर आॅटोरिक्षा चालकांच्या कल्याणाचा विचार आम्ही पुढे नेत आहोत. गेल्या अर्थसंकल्पात आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळासाठी दहा कोटी रू. निधीची तरतूद केली. या मंडळाच्या स्थापनेचा मसूदा तयार असून लवकरच हे मंडळ स्थापन होईल. या माध्यमातून मुलांचे शिक्षण, घर, आरोग्य आदी प्रश्नांचे निराकरण होणार आहे. येत्या काही दिवसातच या मंडळाच्या माध्यमातून आॅटोरिक्षा चालकांचे भविष्य उज्ज्वल होईल, अशी ग्वाही अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र आॅटोरिक्षा चालकांना म्हाडाच्या घरांचे आॅफर लेटर वितरण कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आ. नाना शामकुळे, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, आ. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भिमनवार, आॅटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे राजेंद्र खांडेकर, बळीराम शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, येत्या १५ आॅगस्टला जेव्हा घरांची चावी आॅटोरिक्षा चालकांच्या हाती येईल, तेव्हा मला विशेष आनंद होईल. आॅटोरिक्षा चालकांनी नविन परमीटची मागणी केली आहे. तीसुध्दा निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल. जे ही काम करायचे ते मनापासून केल्यास त्यात निश्चितपणे यश मिळते, यावर माझा विश्वास आहे. देशातील सर्वोत्तम सैनिक शाळा चंद्रपूर जिल्ह्यात साकारली आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने कॅन्सर हॉस्पीटल जिल्ह्यात उभे राहत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालये अशी शिक्षणाची प्रशस्त दालने आपण उपलब्ध केली आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाडाचे मुख्याधिकारी संजय भिमनवार यांनी केले. यावेळी आ. नाना शामकुळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन उषा टेंभुर्डे यांनी केले.
संघर्षाच्या फलश्रुतीने आॅटोरिक्षा चालकांचे कुटुंबीय भारावले
आॅटोरिक्षाचालक रात्री-बेरात्री डोळे पुसत मदतीला धावून येतात. केवळ मोबदला मिळतो. हा त्यामागे हेतू राहात नाही. समाजसेवेची बांधिलकीही त्यात दडलेली असते. अनेक वर्षांपासून ही मंडळी शासनाशी न्यायासाठी संघर्ष करीत आली आहे. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी पालकमंत्री म्हणून ना. सुधीर मुनगंटीवार पालक म्हणून त्यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभेच झाले आणि पालकत्वाची भूमिकेतून अर्थसंकल्पात आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळासाठी १० कोटींची तरतूद केली. याचाच एक भाग म्हणून आॅटोरिक्षा चालकांना गुरुवारी त्यांनी घरांचे आॅफर लेटर दिले. हे लेटर घेताना आॅटोरिक्षा चालकांचे कुटुंबीय अक्षरश: भारावले होते. अनेक वर्षांच्या संघर्षाची फलश्रुती झाल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. ना. मुनगंटीवार यांनाही हे कार्य आपल्या हातून घडत असल्याचा मनस्वी आनंद होत होता.
सफाई कामगारांना घरे उपलब्ध करणार
चंद्रपूर जिल्ह्यातील सफाई कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे उपलब्ध करण्यात येतील, दलित वस्त्यांमध्ये रस्त्यांची कामे मंजूर करण्यात येतील, उत्तम पेयजल व्यवस्था करण्यात येईल तसेच टाटा ट्रस्टच्या सहाय्याने उभारण्यात येणाºया कॅन्सर हॉस्पीटलच्या माध्यमातून कर्करोग तपासणी करण्यात येईल, अशी ग्वाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यातील सर्व मनपा, नगर परिषदा, नगर पंचायती कामगार व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला, या निर्णयाचा लाभ सेवानिवृत्तांनासुध्दा होणार आहे. सफाई कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करण्यात येईल तसेच कॅन्सर हॉस्पीटलच्या माध्यमातून कॅन्सरची तपासणी करण्यात येईल. सफाई कामगारांना साहित्य उपलब्ध करून देण्याबाबतची बाब तपासून याबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल. लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना यावेळी दिल्या.यावेळी फेम इंडिया या मॅग्जींनच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ मंत्री म्हणून गौरव करण्यात आल्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.

असा नेता मिळणे म्हणजे भाग्यच - कुरैशी
यावेळी बोलताना म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी म्हणाले, साडेदहा लाख रू. किंमतीचे घर साडेचार लाखात आपणास उपलब्ध होत आहे, ही महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव घटना आहे. याचे श्रेय ना. मुनगंटीवार यांना जाते. पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचे अंत्योदयाचे स्वप्न ना. मुनगंटीवार प्रत्यक्षात पूर्ण करीत आहेत. असा नेता या जिल्हयाला लाभला हे जिल्हावासियांचे भाग्य असल्याचे तारिक कुरैशी यावेळी बोलताना म्हणाले.

Web Title: Bright future for autorickshaw drivers through the welfare board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.