पॅनकार्ड आणा, तरच मिळणार विद्यार्थ्यांना बॅंकखाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:09+5:302021-07-12T04:18:09+5:30

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्याने शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शासनातर्फे जमा करण्यात येणार ...

Bring PAN card, only then students will get bank account | पॅनकार्ड आणा, तरच मिळणार विद्यार्थ्यांना बॅंकखाते

पॅनकार्ड आणा, तरच मिळणार विद्यार्थ्यांना बॅंकखाते

Next

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्याने शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात शासनातर्फे जमा करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढणे अत्यावश्यक केले आहे. सध्या पालक विद्यार्थ्यांना घेऊन बॅंकेत खाते काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र बॅंकांनी विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड अनिवार्य केले आहे. परिणामी पालकांना आपली मजुरी सोडून या कामात गुंतून रहावे लागत आहे. जमापेक्षा खर्च जास्त, अशी काहीशी अवस्था सध्या पालकांची झाली आहे.

मागील सत्रापासून कोरोना संकटामुळे शाळा भरलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून शासनाने विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यातच शालेय पोषणाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र बॅंक खाते काढण्यासाठी प्रथम पॅनकार्ड आणण्यासंदर्भात बॅंकांकडून सक्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड काढून काही पालक आणत आहे. मात्र यामध्ये त्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यातही पॅनकार्डमध्ये विद्यार्थ्यांचा फोटो राहत नसल्यामुळे बॅंकेकडून शाळेचे बोनाफाइड, आयकार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्र मागितल्या जात आहे. सर्व कागदपत्र गोळा करताना पालकांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे झिरो बॅलेन्सवर बॅंक खाते काढून द्यावे, पॅनकार्ड अनिवार्य करू नये, यासाठी शासनाने बॅंकाना तसे आदेश द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

कोट

शालेय पोषणची रक्कम जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे बॅंक खाते अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र बॅंकांकडून विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड आणण्याचा तगादा लावला जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांना प्रथम पॅनकार्ड त्यानंतर बॅंक खाते काढावे लागत आहे. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. बॅंकांनी आधार कार्ड आणि शाळेच्या बोनाफाइडवर विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढून देणे गरजेचे आहे.

-स्मिता अनिल चिताडे

मुख्याध्यापिका

महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर

कोट

पालक म्हणतात.....

शालेय पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी शाळांकडून बॅंकेचे पासबुक काढण्यासाठी सांगितल्या जात आहे. मात्र बॅंक पॅनकार्ड आणल्याशिवाय पासबुक काढून देण्यास तयार नाही. विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड काढण्यासाठी अतिरिक्त खर्च होत असून, मजुरीही बुडत आहे. १५० रुपयांसाठी बॅंक खाते काढणे परवडण्यासाखे नाही. त्यामुळे शासनाने पालकांच्या खात्यातच पोषण आहाराची रक्कम जमा करावी.

-किरण इटणकर

पालक

कोट

शिक्षक विद्यार्थ्यांचे बॅंक पासबुक काढण्यासाठी सांगत आहे. यामुळे आम्ही कामधंदे सोडून बॅंकेत जावून खाते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅंकवाले विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड आणायला सांगत आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांचा नाईलाज होत आहे. शासन आणि बॅंकेच्या नियमामुळे पालक पिचल्या जात आहे.

-हरिश्चंद्र मारोती बुटले

पालक

बाॅक्स

विद्यार्थ्यांची संख्या

पहिली-२८८२४

दुसरी-३१२७२

तिसरी-४१७८४

चौथी-३३७१९

पाचवी-३२८४५

सहावी-३२३५७

सातवी-३३१६१

आठवी-३३४४१

बाॅक्स

मजुरी करायची की पासबुक काढायचे?

शालेय पोषणची रक्कम जमा करण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांचे बॅंक खाते अनिवार्य केले आहे. यासाठी बॅंकेत पॅनकार्ड मागितल्या जात आहे. बॅंक खाते काढणे, पॅनकार्ड काढण्यासाठी पैसा द्यावा लागत आहे. अनेवेळा मजुरी बुडवून शहरातील बॅंकेत जावे लागत आहे. शालेय पोषणची पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५० ते १६० रुपये तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २५० रुपयांपर्यंत रक्कम बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे बॅंक खात्यात जमा कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था सध्या पालकांची झाली आहे.

बाॅक्स

शाळांकडून पालकांना तगादा

विद्यार्थ्यांचे बॅंक पासबुक काढण्यासाठी शिक्षक पालकांकडे तगादा लावत आहे. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली आहे. शिक्षकांच्या तगाद्यामुळे पालक आपले कामधंदे सोडून बॅंकेत जात आहे. मात्र तिथेही त्यांना कागदपत्रांसाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बाॅक्स

शिक्षकांची झोप उडाली

विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून शाळेला सारखी विचारणा केली जात आहे.

त्यामुळे मुख्याध्यापक शिक्षकांवर बॅंकखात्यासंदर्भात जबाबदारी देत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पालकांना बॅंक खाते काढण्यासाठी सांगत आहे. मात्र यामध्ये शिक्षकांची झोप उडाली आहे.

Web Title: Bring PAN card, only then students will get bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.