सिंचन विभागाचे ब्रिटिशकालीन निवासस्थान वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:46 PM2017-11-12T23:46:52+5:302017-11-12T23:47:11+5:30
ब्रिटिशकालीन सिंदेवाही घोडाझरी सिंचन उपविभागाच्या उपविभागीय अधिकाºयांच्या निवासस्थानाची दूरवस्था झाली असून त्याकडे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
बाबुराव परसावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : ब्रिटिशकालीन सिंदेवाही घोडाझरी सिंचन उपविभागाच्या उपविभागीय अधिकाºयांच्या निवासस्थानाची दूरवस्था झाली असून त्याकडे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मागील दहा-बारा वर्षांपासून या विभागाचे उपविभागीय निवासस्थान व कार्यालयीन इमारतीच्या बांधकामाकडे तसेच परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यालयीन इमारत व निवासस्थानाच्या सभोवताल अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. ब्रिटीश राजवटीत सिंदेवाही येथील हे एकमेव सुंदर व आकर्षक शासकीय निवासस्थान होते. या निवासस्थानाला १५० वर्ष पूर्ण होत आहे. या काळात घोडाझरी तलावाची निर्मिती झाली. तलावाचे काम बघण्यासाठी ब्रिटिश अधिकारी सिंदेवाही मुख्यालयात राहत होते. सिंदेवाहीवरून घोडेस्वार होऊन ते घोडाझरीला जात होते. या निवासस्थानाच्या मागच्या बाजुला ब्रिटिशांनी घोडे बांधण्याकरिता स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली होती. तसेच निवासस्थानापुढे व मागे बगीचा तयार केला होता. बैठकीकरिता एक मोठी खोली आहे. आता ब्रिटीशकालीन हे शासकीय निवासस्थान जीर्ण झाल्यामुळे त्याठिकाणी पाटबंधारे विभागाने नवीन निवासस्थान व कार्यालयीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला होता. नवीन इमारत झाल्यास ब्रिटीशकालीन इमारतीचा ठेवा नष्ट होईल. या उपविभागतंर्गत नवीन निरीक्षणगृह बांधण्यात आले होते. त्या निरीक्षण गृहात २५ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकारी थांबत होते. परंतु पाटबंधारे विभागाने निरीक्षणगृहातच उपविभागीय कार्यालय थाटले आहे. त्यामुळे निरीक्षणगृह (विश्रामगृह) बंद झाले.
निरीक्षणगृहातील बगिचा ओसाड
सिंदेवाही नगराच्या सौंदर्यात भर घालणाºया येथील घोडाझरी निरीक्षणगृहाजवळील बगिच्याची दुर्दशा झाली असून याकडे संबंधित अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले आहे. येथील निरीक्षणगृह व बगिचा हे सिंदेवाहीकरांचे आकर्षण होते. परंतु घोडाझरी सिंचन उपविभागीय कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे उपविभागीय कार्यालय निरीक्षणगृहात स्थानांतरित करण्यात आले. पूर्वी या निरीक्षण गृहात पर्यटकांची सतत वर्दळ असायची. निरीक्षणगृह बंद झाल्यामुळे या निरीक्षण गृहासमोरील बगिचा ओसाड झाला आहे. त्याला आता जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या बगिच्यातील विविध प्रकारची फुलझाडे नष्ट झाली आहेत. बगिच्यात सर्वत्र गवत व झाडे वाढली आहेत. आता या बगिच्यात कुणीही फिरकत नाही. याशिवाय घोडाझरी वसाहत परिसरात पथदिवे बंद आहेत.
उपविभागीय कार्यालय रामभरोसे
तीन तालुक्यांचा कार्यभार सांभाळणाºया ब्रिटीशकालीन सिंदेवाही येथील घोडाझरी सिंचन उपविभागीय कार्यालय मागील पाच वर्षांपासून रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. घोडाझरी उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी कार्यरत आहे. परंतु ते मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे कार्यालयात शुकशुकाट पसरलेला असतो. उपविभागीय अधिकारी कागदपत्रावर सह्या करून मोकळे होतात. सिंदेवाही येथील घोडाझरी सिंचन उपविभागाअंतर्गत सिंदेवाही, नवरगाव, नागभीड, गोविंदपूर, मेंडकी, सिंचाई शाखा कार्यरत आहेत. या उपविभागातंर्गत एक घोडाझरी मध्यम प्रकल्प तर कुसर्ला, चिंधी अड्याळमेंढा, मुडसा, करोली, गडमौशी, पवनपार, मरेगाव, खैरी ९ लघु प्रकल्प तर २४ मामा तलाव मिळून एकुण ३४ तलावांचा समावेश आहे. सर्व तलावाच्या पाण्याने सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन ओलीत होते. पूर्वी कालवा निरीक्षक शेतकºयांकडून पानसारा वसूल करीत होते. परंतु शासनाने वसुलीचे अधिकार पाणी वाटप समितीकडे दिले आहे. या कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत, हे विशेष.