तोडलेल्या पुलामुळे शेतपिके वाहून गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:54+5:302021-09-09T04:34:54+5:30
पाण्याचा प्रवाह बदलून पाणी शेतात : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान गोंडपिपरी : तुटलेल्या पुलात अडकून शेकडो गाय, बैल मरण पावले. ...
पाण्याचा प्रवाह बदलून पाणी शेतात : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
गोंडपिपरी : तुटलेल्या पुलात अडकून शेकडो गाय, बैल मरण पावले. जनावरांना घातक ठरलेहा या पूल जेसीबीने तोडण्यात आला. मात्र, तोडलेल्या पुलाचा मलबा नाल्यात तसाच पडून राहिला. या मलब्यामुळे नाल्याचा प्रवाह दुसऱ्याच दिशेने वाहू लागला. या प्रवाहाने दोन शेतकऱ्यांच्या शेतातील पिके अक्षरश: वाहून गेली. यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील कोंढाणा-सोमणपल्लीला विभागणाऱ्या नाल्यावर पुलाची निर्मिती करण्यात आली. हा पूल पहिल्याच पावसात क्षतिग्रस्त झाला. पावसाळ्यात नाल्याचा प्रवाहातून जाणारी जनावरे पुलात अडकून मरू लागली. त्यामुळे क्षतिग्रस्त पूल पाडण्यात आला. पुलाचा मलबा नाल्याचा पात्रात तसाच पडून आहे. या मलब्याने नाल्याच्या पात्राची दिशा बदलली. पात्र विस्तारित गेले. कोंढाणा येथील भीमराव विठू मावलीकर यांच्या शेताला नाल्याचे पात्र भिडले आहे. मंगळवारी नाल्याला आलेल्या पुराने मावलीकर यांच्या धानशेतीचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण पीक वाहून गेले. मोंडी इजमनकर यांच्या मिरची पिकाचीही अवस्था अशीच झाली. पात्र असेच वाढत गेल्यास संपूर्ण शेती नाल्याच्या पात्रात जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : बोडलावार
झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार यांना दिली. शेतकऱ्याच्या जिवावर उठलेल्या पुलाचा मलबा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच शासन स्तरावरील मदत देऊ, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
080921\img20210908101821.jpg
शेतीचे नुकसान