हायप्रोफाइल नेत्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:22 AM2019-07-26T02:22:44+5:302019-07-26T02:23:29+5:30

काँग्रेसपुढे घराणेशाहीचे आव्हान : शिवसेनेची घर शाबूत ठेवण्यासाठी धडपड, नावाला उरलेल्या राष्ट्रवादीला हवे नवे घर

Brotherhood of aspirants in Chandrapur district of hyprofile leaders | हायप्रोफाइल नेत्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी

हायप्रोफाइल नेत्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी

Next

राजेश भोजेकर

चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, या हायप्रोफाईल नेत्यांच्या जिल्ह्यात सहापैकी तीन ठिकाणी तिरंगी तर तीन ठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र आहे. राजुरा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि चिमूर येथे भाजप, वरोरा शिवसेना, तर ब्रह्मपुरी काँग्रेसकडे आहेत. आघाडीत काँग्रेसचा सर्वच सहाही जागांवर दावा आहे. मात्र राष्ट्रवादीने ब्रह्मपुरी, राजुरा व बल्लारपूरसाठी हालचाली चालविल्या आहेत. ब्रह्मपुरी हा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांचा येथून जुनाच दावा आहे. राजुऱ्यात गत निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचा फार थोड्या फरकाने पराभव झाला. राष्ट्रवादीकडून माजी आमदार सुदर्शन निमकर फिल्डींग लावून असले तरी काँग्रेस ही जागा सोडण्याची चिन्हे नाहीत.

बल्लारपूरवर राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांचा डोळा आहे. २०१४ चे काँग्रेस उमेदवार घनश्याम मुलचंदानी हेही तयारीत आहे. हा मतदारसंघ वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा असून त्यांनी या क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला आहे. त्यांच्या तोडीचा उमेदवार आघाडीकडे दिसत नाही. चंद्रपूरची जागा आघाडीत काँग्रेसकडेच राहील. २०१४ मध्ये काँग्रेसचे महेश मेंढे तिसºया क्रमांकावर होते. हे हेरून दुसºया क्रमांकावरील शिवसेना उमेदवार किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.

चिमूरमध्ये आघाडीकडून काँग्रेस जि. प. गटनेता व माजी आमदार अविनाश वारजुकर यांचे धाकटे बंधू डॉ. सतीश वारजुकर पूर्ण तयारीत आहेत. त्यांचा दावा मजबूत मानला जात आहे. वरोºयात काँग्रेस घराणेशाहीत अडकली आहे. गत निवडणुकीत डॉ. आसावरी देवतळे या तिसºया क्रमांकावर होत्या. आता त्यांच्यासह त्यांचे यजमान डॉ. विजय देवतळेही इच्छुक आहेत. तसेच खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आपल्या पत्नीचे, प्रतिभा यांचे नाव पुढे केल्याने काँग्रेसपुढे घराणेशाहीचे नवे आव्हान आहे.

युतीमध्ये भाजप चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, ब्रह्मपुरी आणि चिमूर या पाच जागांवर तयारीत आहे. चंद्रपुरात आमदार नाना श्यामकुळे यांना दावेदार मानले जात असले तरी भाजपचे जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे उमेदवार बदलाची आशा बाळगून आहेत. राजुरा येथे आमदार अ‍ॅड. संजय धोटे हे पूर्ण तयारीत असले तरी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळेंचाही या मतदारसंघावर डोळा आहे.
ब्रह्मपुरीत युतीकडून भाजपचे माजी आमदार अतुल देशकर तयारीत असले तरी हा मतदार संघ काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा असल्यामुळे भाजपला दमदार उमेदवाराचा शोध आहे. चिमूरमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया हे एकमेव दावेदार मानले जात आहेत.

वरोºयात शिवसेनेचे वर्चस्व आहे. सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसकडून लोकसभा जिंकली. ही संधी साधून काँग्रेसचा हात सोडून भाजपात गेलेले माजी मंत्री संजय देवतळे हे पुन्हा बाशिंग बांधून तयार आहेत. येथे शिवसेनेचा दावा मजबूत असून भद्रावती नगराध्यक्ष अनिल धानोरकर पूर्ण तयारीत आहेत. अनिल धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून चिमूर मतदारसंघात अरविंद सांदेकर हे नाव पुढे आहे.

एकूण जागा : ६ । सध्याचे बलाबल भाजप-०४, शिवसेना-०१, कॉँग्रेस-०१

Web Title: Brotherhood of aspirants in Chandrapur district of hyprofile leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.