वर्धा नदीवरील शिवणी येथे बंधारा बांधावा
By admin | Published: May 27, 2016 01:12 AM2016-05-27T01:12:18+5:302016-05-27T01:12:18+5:30
वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचनाची सुविधा व्हावी, परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा,
चार तालुक्यांना लाभ : शासनाच्या दुर्लक्षाने गावकऱ्यांत रोष
चंद्रपूर : वर्धा नदीपट्टयातील शेतीला सिंचनाची सुविधा व्हावी, परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, या उद्देशातून चंद्रपूर शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणी (बोर) येथे वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वी नागरिकांनी स्वाक्षरी अभियान राबविले. परंतु, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वर्धा नदीपट्टयातील जमीन सुपीक आहे. परिसरात सिंचनाची सुविधा झाल्यास तेथील शेती समृद्ध होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते. परंतु, सद्य:स्थितीत परिसरात सिंचनाची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. २० वर्षांपूर्वी या परिसरात हडस्ती, धानोरा (पिपरी) आणि शिवणी (चोर) येथे वर्धा नदीवर उपसा जलसिंचन योजना कार्यरत होत्या. परंतु, कालांतराने या तिन्ही योजना बंद पडल्या. तेव्हापासून या परिसरातील शेतकरी निसर्गावर अवलंबून शेती करीत आहेत.
शिवणी येथे वर्धा नदीवर बंधारा झाल्यास भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. नदीकाठावरील राजुरा, कोरपना या तालुक्यातील गावांसोबतच चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील काही गावांना सिंचनाची सुविधा होईल. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुटेल. यासाठी येथे बंधारा बांधण्यात यावा म्हणून परिसरातील शिवणी, धिडशी, चार्ली, निर्ली, पेल्लोरा, किनबोडी, कढोली येथील गावकऱ्यांनी स्वाक्षरी अभियान राबविले होते. परंतु, शासनाने येथील नागरिकांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. २००३ मध्ये शिवणी, मार्डा परिसरात बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु पुढे या कामाचे काय झाले, हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे शिवणी येथे बंधारा बांधून नागरिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष उमाकांत धांडे यांनी केली आहे.
शिवणी येथे बंधारा झाल्यास मार्डा, धिडसी, चार्ली, निर्ली, साखरी, पेल्लोरा, वरोडा, किनबोडी, कुर्ली, हडस्ती, कढोली, जैतापूर, भोयगाव, पिपरी, धानोरा आणि परिसरातील अन्य गावांना लाभ होणार आहे. त्यामुळे बंधारा बांधकामाला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी उमाकांत धांडे यांच्यासह चार्लीच्या सरपंच पौर्णिमा दुबे, उपसरपंच किशोर ढुमणे, पेल्लोराचे उपसरपंच किशोर ढुमणे, पेल्लोराचे उपसरपंच भोयर, प्रमोद धांडे, जयश्री धांडे, सावित्री पंधरे, सुनीता वराटे, ताराताई कौरासे, संदीप डाखरे, लक्ष्मणराव एकरे, रवींद्र चटके, निमणीचे सरपंच गजानन भोंगळे, विनोद झाडे, संजय उमरे, रामदास उपरे, रमेश झाडे, बळीराम वैद्य, मंगेश भोयर, सुरेश पोडे, दौलतराव घटे, उत्तम बोबडे, वरोडाचे सरपंच साईनाथ देठे, नत्थू बोबडे, लहू भोयर, कवडू कौरासे, कवडू गोरे, सुरेश वराटे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, दीपक पाचभाई, पोवनीचे श्रावण मालेकर, निळकंठ दुबे, सुनील वनकर, नंदकिशोर कौरासे, पंकज दुबे, सुनील जीवतोडे, रामदास पंधरे, अनिल बहिरे, दत्ता तुराणकर, लटारी आवारी, अनिल तुरणकर, सुदर्शन क्षीरसागर, संजय गोरे, संबाशिव लाडे, कवडू पोडे, बाळा धांडे, संजय चटके, सुरेश ढुमणे, अनिल आस्वले, किशोर धांडे, डॉ. अरविंद ठाकरे, प्रा. देवराव ठावरी, दीपक पाचभाई, अशोक वासाडे, विवेक गोखरे, गणेश जोगी, राकेश गोखरे, बबन पारखी यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)