भिसी येथे प्रसाधनगृह बांधावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:27+5:302021-09-27T04:30:27+5:30
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील ...
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
पुलावर कठडे लागणार कधी?
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
परराज्यांतून आलेल्यांना प्रतिबंध घाला
सिंदेवाही : तालुक्यात, शहरात परराज्यांतून शेकडोंच्या वर फेरीवाले दाखल झाले आहेत. ही मंडळी चटई, प्लास्टिकच्या वस्तू विकताना दिसत आहेत. कोराेनाच्या तिसऱ्या लाटेची भीती विचारात घेता या फेरीवाल्यांना प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नद्यांच्या नावाचे फलक लावावे
चंद्रपूर : जिल्ह्यातील इरई, झरपट, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा शिरणा आदी नद्या वाहतात. परंतु, या नद्यांवर नद्यांच्या नावाचे फलक नसल्याने जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नदीच्या नावाबाबत अनभिज्ञता असते. चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे.
शौचालयात ठेवतात अडगळीतले साहित्य
पोंभूर्णा : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नाही. शासनाकडून हगणदारीमुक्त मोहिमेचा मोठा गाजावाजा फक्त करण्यात येतो.
पाण्याच्या टाक्या ठरत आहेत शोभेच्या
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नाही.
शाळेची धुरा आता स्थानिक समितीवर
नागभीड : शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असला तरी या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक समितीवर सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर समिती गठीत करून शासनाकडून सुचविण्यात आलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा करूनच शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बांधकाम साहित्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य
चंद्रपूर : शहरातील प्रत्येक वॉर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य व वाहने ठेवण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी, नागरिक त्याच ठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे कचऱ्याचे मोठे ढिगारे तयार होत आहे.