रेन वॉटर हॉर्वेस्टिंग न करणे बांधकामधारकांना भोवले, महानगरपालिकेची कारवाई
By राजेश मडावी | Published: May 23, 2023 05:39 PM2023-05-23T17:39:51+5:302023-05-23T17:41:20+5:30
बांधकामधारकांची अनामत रक्कम जप्त
चंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य आहे. त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारली जाते. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रेनवॉटर हॉर्वेस्टिंग केल्याचे पुरावे सादर न केल्याने महानगरपालिकाने मंगळवारी सहा बांधकामधारकांची अनामत रक्कम जप्त केली.
चंद्रपुरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची गरज आहे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मनपमार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम सुरू केले रेन वॉटर हार्वेस्टिंगची अमलबजावणी करण्यासाठी मालमत्ताधारकांना मनपाकडून घराच्या छताच्या आकारमानानुसार ५ हजार, ७ हजार, १० हजार असे वाढीव अनुदान तथा पुढील ३ वर्षांपर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट दिली जात आहे. बांधकामधारांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी यापूर्वी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र या कालावधीत पुरावे सादर न केल्याने तुकूम, वडगाव, भानापेठ व समाधी वॉर्ड, शास्त्रीनगर येथील सहा बांधकाम परवानगीधारकांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली.
प्रोत्साहनासाठी जलमित्रांच्या नियुक्त्या
रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक वार्डात स्वेच्छेने काम करणारे जलमित्र मनपाकडून नियुक्त केले जात आहेत. जलमित्र म्हणून काम करताना त्यांच्या वॉर्डात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. जलमित्रांच्या प्रोत्साहनामुळे १०१ घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास प्लॅटिनम,५१ घरी केल्यास गोल्ड व २१ घरी हार्वेस्टिंग केल्यास सिल्वर श्रेणीने पुरस्कृत केले जाणार आहे. जलमित्र म्हणून काम करावयाचे असल्यास मनपा रेन वॉटर हार्वेस्टिंग कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
शहरातील विहीर, बोअरवेल धारकांनाही रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. यासाठी त्यांना काही दिवसांचा कालावधी दिला जातो. या कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग न केल्यास २० हजारांचा दंड ठोठाविण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी ही यंत्रणा बसवून प्रशासनाला सहकार्य करावे.
- विपीन पालिपाल, आयुक्त महापालिका चंद्रपूर