अतिक्रमणावर चालणार ‘बुलडोजर’
By admin | Published: August 21, 2014 11:46 PM2014-08-21T23:46:15+5:302014-08-21T23:46:15+5:30
शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. त्यामुळे चंद्रपुरातील
मनपा सकारात्मक : रस्ते रुंदंीकरणाला दिले प्राधान्य
चंद्रपूर : शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. आता रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला आमसभेत मंजुरी मिळाली आहे. नवे आयुक्तही याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अतिकमणावर लवकरच बुलडोजर चालण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखापर्यंत पोहचली आहे. चारचाकी व दुचाकींची संख्याही लाखोंच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सायंकाळच्या सुमारास तर ही वर्दळ आणखी वाढते. वाहनांचे आवागमन या मार्गावरून अधिक असले तरी त्या तुलनेत पार्र्कींग झोन उपलब्ध नाहीत. शहरात पाच ते सहा ठिकाणीच महानगरपालिकेचे पार्र्कींग झोन आहेत. कस्तुरबा मार्ग व महात्मा गांधी मार्गावर रस्त्याच्या एका कडेलाच पार्कीगसाठी व्यवस्था केली आहे. यामुळे पार्र्कींगची तात्पुरर्ती सोय तर होते. मात्र आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे.
नगर विकास आराखड्यात महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग सुमारे ७० ते ८० फुट रुंद असावा, असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही रस्ते सुमारे ५० फुट रुंदच आहे. यातील दोन्ही बाजुला वाहनांची पार्र्कींग असते. त्यामुळे वाहनांच्या मार्गक्रमणासाठी केवळ ३० फुटाचाच रस्ता शिल्लक राहतो. वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे किमान जिथे वाहनांचा सर्वाधिक संपर्क येतो, त्या महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गांना रुंद करणे गरजेचे आहे. चंद्रपुरात मनपा झाली तरी हे मार्ग रुंद होऊ शकले नाही. उलट अनेक ठिकाणी हे रस्ते जरा निमुळतेच झाले आहे. या रस्त्यांवरच बाजारपेठ असल्याने अनेक व्यावसायिकांनी रस्त्यांवर पक्के बांधकाम केले आहे. काही जागा व्यावसायिकांची असली तरी नगर विकास आराखड्यानुसार महापालिकेने रस्त्यांसाठी ही जागा व्यावसायिकांकडून संपादन केली नाही. रोजची वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची ओरड बघून यंदा महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या रुंदीकरणाला प्राधान्य देण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या आमसभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच या विषयाला सर्व नगरसेवकांनी उचलून धरले आणि या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आता याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. नगरविकास आराखड्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण करायचे असेल तर महापालिकेला अनेकठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. सध्या महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग या दोन रस्त्यांचा विचार केला तर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. राजकीय इच्छाशक्ती मजबुत असेल व अधिकाऱ्यांनी तत्परता दाखविली तर लवकरच या अतिक्रमणावर बुलडोजर चालून रस्ते मोकळे होण्यास वेळ लागणार नाही. उल्लेखनीय असे की मनपा आयुक्तही याबाबत सकरात्मक आहेत.(शहर प्रतिनिधी)