अतिक्रमणावर चालला बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:29 PM2017-12-27T23:29:51+5:302017-12-27T23:30:38+5:30
अतिक्रमणाबाबतची आपली मोहीम आणखी तीव्र करीत मनपाच्या पथकाने बुधवारी बिनबा गेट मटण मार्केट परिसरातील व बियाणी पेट्रोलपंप परिसरातील अतिक्रमण हटविले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : अतिक्रमणाबाबतची आपली मोहीम आणखी तीव्र करीत मनपाच्या पथकाने बुधवारी बिनबा गेट मटण मार्केट परिसरातील व बियाणी पेट्रोलपंप परिसरातील अतिक्रमण हटविले. यात १७ वर्षांपासूनचे पक्के बांधकामही जेसीबी लावून जमोनदोस्त करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून महानगरपालिकेतील अतिक्रमण हटाव पथकाने मोहीम सुरू केली आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ मोकळे केले जात आहे. आठवडाभरापूर्वी बसस्थानक चौकातील अतिक्रमण हटविले. बागला चौक आणि बंगाली कॅम्प परिसरातील अतिक्रमण हटवून चौक मोकळा करण्यात आला. या ठिकाणी आता चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी हे पथक बिनबा गेट परिसरातील मटण मार्केटमध्ये गेले. तिथे मोहम्मद इलियास व मोहम्मद इकबाल यांनी मनपाने दिलेल्या जागेत अवैधरित्या पक्के बांधकाम करून दुकानाला शटरही लावले होते. सोबतच मागच्या बाजुला असलेल्या ६० बाय ३० फूट जागेतही अवैध बांधकाम केले होते. हे अतिक्रमण जेसीबी लावून तोडण्यात आले. अवैधरित्या उभारलेले शेडही तोडण्यात आले. अवैधरित्या बांधकाम केलेल्या खोल्यांमध्ये जवळजवळ एक ट्रक कोंबड्या होत्या. त्यादेखील बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर याच परिसरातील मच्छी मार्केटमधील गाळ्यात मोहम्मद लतिफ इकबाल हुसैन यांना मनपाने दोन गाळे दिले होते. या गाळ्यांमध्ये हुसैन यांनी आपल्या पध्दतीने बांधकाम करून दुकान ‘आल्टर’ केले. हे बांधकामदेखील तोडण्यात आले.
ही कारवाई मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, कर विभाग प्रमुख तुकड्यादास डुमरे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष ठोंबरे, मार्केट निरीक्षक लक्ष्मण आत्राम व अतिक्रमण पथकाने केली.
कार्यवाहीपूर्वी पोलिसात एफआयआर
अतिक्रमण हटविताना तणावाची स्थिती व इतर अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी मनपाच्या वतीने मंगळवारीच पोलिसात तक्रार दाखल केली होती. मनपाच्या मालमत्तेची अवैधरित्या तोडफोड केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यानंतर बुधवारी अतिक्रमण तोडण्याची कार्यवाही करण्यात आली.
वारंवार बजावल्या होत्या नोटीस
मटण मार्केट परिसरात मोहम्मद इलियास व मोहम्मद इकबाल यांनी मागील १७ वर्षांपासून अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले होते. चंद्रपुरात नगरपालिका असताना कार्यरत प्रत्येक मुख्याधिकाºयांनी हे अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. मात्र राजकीय व इतर हस्तक्षेपामुळे आजवर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होऊ शकली नाही. यावेळी मात्र आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.
फुटपाथही केले मोकळे
तुकूम परिसरातील बियाणी पेट्रोलपंप ते विधी महाविद्यालयादरम्यान रस्त्यावरील फुटपाथवर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते. याच फुटपाथवर चिकण व मटण मार्केट थाटण्यात आले होते. तेदेखील हटवून साहित्य जप्त करण्यात आले. या मटण मार्केटबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या, हे विशेष