अतिक्रमणावर चालणार बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 12:50 AM2017-06-28T00:50:18+5:302017-06-28T00:50:18+5:30
मंगळवारी दुपारी महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली.
मनपाची सर्वसाधारण सभा : वाढीव क्षेत्राच्या विकास योजनेस मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मंगळवारी दुपारी महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील वाढीव क्षेत्राच्या विकास योजनेस मंजूरी व अवैधरित्या करण्यात येत असलेले बांधकाम हटविण्यास मंजुरी देण्यात आली.
सभेला उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. सभेत पावसाळ्यापूर्वी मोठ्या नाल्यावरील अतिक्रमण, शहरातील नर्सिंग होम तसेच आऊटडोर क्लिनीकची नोंदणी, नूतनीकरण शुल्क ठरविणे, आदर्श वॉर्ड स्पर्धा राबविण्याचे धोरण ठरविणे, मनपा शाळा डिजिटल करणे, अग्निशमन विभागातील मंजूर पदाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडे मंजुरीकरिता पाठविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी महापौर घोटेकर यांनी, पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य नाल्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरु आहे. बरेच अतिक्रमण पथकाने काढले आहे. पोलीस बंदोबस्त वेळेवर न मिळाल्याने काही ठिकाणचे अवैध अतिक्रमण काढता आले नाही, असे सांगितले. तसेच पावसाळा सुरु झाल्याने लोकांना बेघर करता येत नसल्याने अतिक्रमणाची कार्यवाही पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. परंतु ज्या प्लॉटधारकांनी बांधकामाची परवानगी न घेता बांधकाम केले तसेच बांधकाम मंजुरी घेऊन नियमानुसार बांधकाम न करता अतिरिक्त बांधकाम करणाऱ्या बांधकाम धारकांवर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे महापौर यांनी सांगितले.
अकृषक ले-आऊट मध्ये ज्यांनी बांधकाम केलेले आहे. त्यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी गुंठ्ठेवारी तत्वावर प्रकरण दाखल करुन घराच्या बांधकामाची मंजुरी घ्यावी व अवैध बांधकाम नियमाकुल करावे तसेच विवेकनगरातील पाच मजली इमारत अवैध असल्याबाबत तसेच राधाकृष्ण सभागृह, शकुंतला लॉन, खुल्या जागेवरील अवैध बांधकाम याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. नगर अभियंता, झोनल अभियंता यांना त्यांचे झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभागातील अवैध बांधकामाची यादी तयार करुन त्यावर त्वरीत बांधकाम निष्कासीत करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर घोटेकर यांनी दिले. आदर्श वार्ड योजना उत्तम आहे. सर्व नगरसेवकांनी आप आपल्या प्रभागातील समस्या जाणून त्या सोडवाव्या व आपला प्रभाग आदर्श बनवावा. विविध प्रभागात डुक्कर, मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी डुकरांची कत्तल करुन मांस विक्री होत आहे. अशा व्यावसायिकावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश महापौर घोटेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मनपा शाळांची डिजिटलकडे वाटचाल
महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या दर्जा उंचविण्यासाठी मनपाच्या शाळा डिजिटल करण्याचे काम सुरु आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स-बेंचची व्यवस्था करण्यात येत असून गणवेश, बूट, पायमोचे देण्यात येणार आहेत. शाळेला रंगरंगोटी करण्याचा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठविण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विशेष निधी उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे आता मनपाच्या प्राथमिक शाळा खाजगी शाळेसारख्या डिजिटल होणार असल्याचे महापौर घोटेकर यांनी सभेत सांगितले.
नर्सिंग होमवर होणार कार्यवाही
चंद्रपूर शहरातील नर्सिंग होमचे आऊटडोर क्लिनिकची नोंदणी, नूतनीकरण आधी जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडे होत होते. परंतु, शासनाच्या परिपत्रकानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका झाल्याने अशा दवाखान्यांची नोंदणी व नूतनीकरण हे मनपाकडे एमओएचच्या अधिनियमातर्गंत करण्यात येणार आहे. नोंदणी व नूतनीकरण न करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
घरगुती जागेत काही डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. तेथे पार्किंगची व्यवस्था नाही व संबंधीत ले-आऊट धारकांचे नाहकरत प्रमाणपत्र न घेता अवैध रित्या नर्सिंग होम सुरु केलेले आहे. अशा अवैध दवाखान्यावर महाराष्ट्र (मुंबई) सुश्रृषा अधिनियमाअंतर्गत कार्यवाही करण्यात येईल.
दे. गो. तुकूम शाळेचे
नामकरण
मनपाच्या दे. गो. तुकूम प्राथमिक शाळेला पंडीत दिनदयाल उपाध्याय प्राथमिक शाळा असे नाव देण्यास सभागृहाने सर्व सहमतीने मंजूरी दिली. त्यामुळे या शाळेचे आता नव्याने नामकरण झाले आहे.