वीजबिलाचे तोरण बांधून नारळ फोडले
By admin | Published: July 8, 2016 12:44 AM2016-07-08T00:44:55+5:302016-07-08T00:44:55+5:30
महावितरण कंपनीकडून प्रस्तावित करण्यात आलेली भरमसाठी वीज दरवाढ तात्काळ मागे घ्यावी,
रणशिंग फुंकले : वीज दरवाढीविरोधात जनतेचा आक्रोश
चंद्रपूर : महावितरण कंपनीकडून प्रस्तावित करण्यात आलेली भरमसाठी वीज दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, चंद्रपूर जिल्हावासीयांना वीज दरात ५० टक्के सुट द्यावी, या मागणीसाठी नागरिक आज गुरुवारी रस्त्यावर उतरले. बाबुपेठ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर प्रहारच्या नेतृत्वात वीज बिलाचे तोरण बांधून व नारळ फोडून वीज दरवाढविरोधातील जनआंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.
राज्यातील ३० टक्क्यापेक्षा जास्त वीजनिर्मिती एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात होते. यासाठी हजारो टन कोळसा रोज जाळला जातो. त्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. प्रदूषण व आरोग्याचे गंभीर परिणाम जिल्हावासीयांना भोगावे लागतात. जिल्ह्यातील करोडो लिटर पाणी वापरण्यात येते. उष्णतेमुळे नागरिकाना विजेचा जास्त वापर करावा लागतो. प्रदूषणामुळे आरोग्याचा खर्च वाढतो. या सर्व गोष्टीचा विचार करून जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना वीज दरात ५० टक्के सुट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.
शेजारील राज्यापेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर दीड ते दोन पट जास्त आहेत. त्यामुळे ५०० च्या वर उद्योग राज्याबाहेर गेल्याने बेरोजगारीत मोठी वाढ झालेली आहे. तसेच नवीन रोजगार निर्मिती बंद पडलेली आहे. वीज बिल व त्यातील छुप्या दरवाढीमुळे सामान्य माणसाचे आधीच कंबरडे मोडले आहे. अशातच महावितरणने नवीन दरवाढीचा प्रस्ताव ठेऊन ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यात विजेचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. वीज दरवाढीचा प्रस्तावावर जनसुनावणीचे आयोजन करून शासनाने पुन्हा एकदा दुटप्पीपणा केलेला आहे. प्रस्तावित भरमसाठ वीज दरवाढ ही राज्याचे भवितव्य अंधकारमय करणारी असल्याने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारने प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात जनआंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कोणत्याही परिस्थितीत ही दरवाढ हाणून पाडू, असा प्रहारने शासनाला सज्जड इशारा दिलेला आहे.
दरम्यान, आज गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नागरिकांसह प्रहारचे कार्यकर्ते बाबूपेठ येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एकत्रित झाले. कार्यालयाच्या मुख्य दारावर कार्यकर्त्यांनी वीज बिलाचे तोरण बांधले. त्यानंतर प्रहारचे जिल्हाप्रमुख पप्पू देशमुख व महिला कार्यकर्त्या करुणा तायडे यांनी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर नारळ फोडून वीज दरवाढविरोधातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना वीज दरात ५० टक्के सुट देण्याच्या मागणीसाठी जनआंदोलनाला सुरुवात झाल्याची घोषणा केली. महावितरणच्या भ्रष्टाचार व दरवाढविरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर एका शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता यांना भेटून निवेदन दिले.
आज झालेल्या आंदोलनात प्रहारचे जिल्हा संघटक फिरोजखान पठाण, घनश्याम येरगुडे, सतीश खोब्रागडे, हरिदास देवगडे, गोपाळराव तायडे, दिनेश कंपू, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख अक्षय येरगुडे, जिल्हा महासचिव राहुल दडमल, करुणा तायडे, शेफाली वानखेडे, रुपा बैरम, करुणा खोब्रागडे, अनिता पाचाभाई, विकास मोरेवार, नंदू सोनारकर, नरसिंग सिलसिला, दुशंत लाटेलवार, अजय दुर्योधन सचिन वाळके, हरिभाऊ बिट्टूरवार, गोटू मानेकर, विजय बैरम यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)