१८ गावांचा डोलारा एकट्या चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:31 PM2024-09-19T12:31:41+5:302024-09-19T12:32:49+5:30

परिचारिकांची पदे रिक्त : रुग्णांची होतेय गैरसोय

Burden of 18 villages at Chiroli Primary Health Center alone | १८ गावांचा डोलारा एकट्या चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर

Burden of 18 villages at Chiroli Primary Health Center alone

लोकमत न्यूज नेटवर्क 
मूल:
ग्रामीण भागातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र रिक्त पदांच्या ग्रहणाने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मूल तालुक्यातील चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १८ गावांचा डोलारा असून परिचारिकाची पदे रिक्त असल्याने सेवा देण्यास अडचण निर्माण होत आहे. गैरसोय टाळण्यासाठी रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.


लांब अंतरावर जाऊन उपचार करणे ग्रामीण जनतेला अडचणीचे होत असल्याने गावाजवळच उपचार करता यावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील चिरोलीअंतर्गत १८ गावे येत असून यात चिरोली, जानाळा, फुलझरी, आगडी, कांतापेठ, टोलेवाही, केळझर, खालवसपेठ, सुशी दाबगाव, दाबगाव मक्ता, नलेश्वर, भगवानपूर, व इतर गावांचा समावेश आहे. या गावातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात.


त्यांना योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय यंत्रणा सज्ज असली पाहिजे मात्र वैद्यकीय अधिकारी असेल तरी परिचारिकाची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे तात्पुरता दिलासा देत रुग्णांवर उपचार सुरू असले तरी ही उपाययोजना तोकड्या स्वरूपात आहे. दररोज शेकडो रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात. त्यामुळे सर्वांना योग्य उपचार करणे कठीण जात आहे. आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी नेमणे आवश्यक आहे. मात्र रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक रुग्णांवर उपचार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याकडे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.


"करोडो रुपये खर्च करून चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी सर्व सुविधा व कर्मचारी नेमले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अनेक वर्षांपासून परिचारिकांची पदे रिक्त आहेत. रुग्णाला सलाईन लावल्यानंतर ते काढण्यासाठी बऱ्याच वेळानंतर परिचारिका येत असतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे." 
-स्वी वाळके, सामजिक कार्यकर्ते दाबगाव मक्ता.


"प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही परिचारिकांची पदे रिक्त आहेत. तसेच शासनाचे क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी बीसीजी लस देण्याची मोहीम आणली आहे. त्यामुळे परिचारिकांना लस देण्यासाठी पाठविण्यात आले आहे. रिक्त असलेल्या पदाची पूर्तता होणे गरजेचे आहे." 
-डॉ. अश्विनी रामटेके, वैद्यकीय अधिकारी चिरोली


 

Web Title: Burden of 18 villages at Chiroli Primary Health Center alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.