२२ गावांचा एकाच प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:00+5:302021-05-31T04:21:00+5:30
प्रकाश पाटील मासळ ( बु ) : राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी बफर झोन लगत मासळ ...
प्रकाश पाटील
मासळ ( बु ) : राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी बफर झोन लगत मासळ परिसर असून याच परिसरातील मासळ (बु),पळसगाव, वडसी या तीन गावात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. येथे अनेक गावातील पशुपालक आपल्या जनावरांना उपचारासाठी आणतात. मात्र तिन्ही गावांतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मागील अनेक वर्षापासून रिक्त असल्याने २२ गावांचा कारभार एक प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी सांभाळतात. त्यामुळे स्थायी डॉक्टरांची नियुक्ती व परिचर पदे भरावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
मासळ परिसरातील पळसगाव, मासळ (बु ), वडसी या तिन्ही पशुदवाखान्याअंतर्गत २२ गावांमध्ये ६० टक्क्यांच्या वर शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे ३ ते ४ जनावरे आहेत. अनेकदा जनावरांच्या तब्येती बिघडल्यानंतर त्यांना दवाखान्यात न्यावे लागते. मात्र या तिन्ही पशुदवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने जांभूळघाट येथील पशुवैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर कावळे यांच्याकडे पदभार आहे. तर पशुवैद्यकीय अधिकारी नसताना याच दवाखान्यातील परिचराच्या भरवशावर संपूर्ण दवाखान्याचा भार असतो. परंतु वडसी येथील परिचरपद एका वर्षापासून रिक्त तर मागील अनेक दिवसांपासून मासळ येथील परिचर अर्जित रजेवर आहे. त्यामुळे जनावरांवर वेळीच योग्य उपचार होत नाही.
आता काही दिवसांपूर्वी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात झाली. अशा परिस्थितीत जनावरांचे आरोग्य बिघडू नये व त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावा, यासाठी मासळ परिसरातील पळसगाव, मासळ(बु), वडसी या तिन्ही पशुदवाखान्यातील डॉक्टर व वडसी, मासळ(बु) येथील परिचर पदे भरावीत तसेच या ठिकाणी स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मासळ परिसरातील पशुपालक शेतकरी करीत आहेत.
बॉक्स
मुक्या जनावरांचा वाली कोण?
परिसरातील पळसगाव येथील डॉक्टराचे पद मागील एका वर्षापासून रिक्त असून वडसी येथील डॉक्टर, परिचर पदे चार वर्षापासून रिक्त आहेत. मासळ(बु ) येथील डॉक्टराचे पद तीन वर्षापासून रिक्त आहे. तर येथील परिचर मागील अनेक महिन्यापासून प्रकृती बरी नसल्याने रजेवर आहे. या तिन्ही पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रभार असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर कावळे यांच्याकडे चिमूर येथील पशुधन पर्यवेक्षक पद रिक्त असल्याने तेथील पदभारसुध्दा आहे. त्यामुळे आजारी जनावरांचे हाल होत आहेत.