शेगाव येथे आगीत गुरांचा गोठा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:35+5:302021-08-22T04:30:35+5:30
भद्रावती : अचानक लागलेल्या भीषण आगीत गुरांचा गोठा जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील ...
भद्रावती : अचानक लागलेल्या भीषण आगीत गुरांचा गोठा जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील शेगाव (खुर्द) येथे घडली.
शेगाव (खुर्द) येथील शेतकरी धनंजय विनायक भागडे हे शेतीसोबतच जोडधंदा म्हणून बकरी पालन व्यवसाय करतात. घटनेच्या दिवशी ते गावाच्या शेजारी मोकळ्या जागेत बकऱ्या चारायला घेऊन गेले होते. त्यांची पत्नी शेतात गेली होती. त्यामुळे घरी कोणी नव्हते. दरम्यान, दुपारी ४ वाजताच्या सुमारास घरामागे असलेल्या गोठ्याला अचानक आग लागली. गोठ्यातून धूर निघत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावात ही माहिती दिली. त्यामुळे आग विझविण्याकरीता सर्वत्र धावपळ सुरू झाली. भद्रावती येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात ग्रामस्थांना यश आले, परंतु तोपर्यंत भागडे यांचा संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. यात भागडे यांचे शेती उपयोगी साहित्य वखर, नांगर व तणस, कुटार असा गुरांचा चारा आणि बकरीचे चार पिल्ले जळून खाक झाले. यात दोन लाखांचे नुकसान झाले. तलाठी श्रीकांत गीते यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे.
210821\img-20210821-wa0000.jpg
फोटो