आगीत चार घरे बेचिराख
By Admin | Published: April 1, 2017 01:36 AM2017-04-01T01:36:22+5:302017-04-01T01:36:22+5:30
सिंदेवाहीपासून १२ किमी अंतरावर असलेल्या कच्चेपार येथे अचानक लागलेल्या आगीत चार घरे व दोन गोठे जळून खाक झाले.
कच्चेपार येथील घटना : पाच लाखांचे नुकसान
सिंदेवाही : सिंदेवाहीपासून १२ किमी अंतरावर असलेल्या कच्चेपार येथे अचानक लागलेल्या आगीत चार घरे व दोन गोठे जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी व चमू कच्चेपार येथे पोहोचली. आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मूल व ब्रह्मपुरी येथील नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला बोलाविण्यात आले. त्यानंतर आग नियंत्रणात आली. या घटनेत दयाराम धर्मा नैताम, बिसनसिंग नारायण जुनी, शरीफसिंग जुनी यांचे घर जळून खाक झाले. तसेच ईश्वर भांडेकर, रोहीदास कोहरे, विनायक पिपरे यांचे घर व गोठे जळाले. या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे. चुलीत असलेल्या कोंढा जळत असताना निखारे हवेमुळे पेट घेतल्याने आग लागल्याची चर्चा आहे.
या घटनेचा प्रशासनाकडून त्वरीत पंचनामा करण्यात आला. यावेळी तहसीलदार भास्कर बांबोळे, गटविकास अधिकारी ईगुलवार, जि.प. सदस्य नागराज गेडाम, नायब तहसीलदार नैताम, मंडळ अधिकारी चिडे, तलाठी वाघमारे, सागुळले, निखाते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)