अज्ञाताने जाळले धानाचे पुंजणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:29 PM2017-11-17T23:29:14+5:302017-11-17T23:30:09+5:30
मौजा पांढरवानी शिवारात अज्ञात इसमाने कुंडलिक जयराम गराटे या शेतकऱ्यांच्या शेतातील तीन एकरवरील धानाचे पुंजणे आग लावून जाळून खाक केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरी : मौजा पांढरवानी शिवारात अज्ञात इसमाने कुंडलिक जयराम गराटे या शेतकऱ्यांच्या शेतातील तीन एकरवरील धानाचे पुंजणे आग लावून जाळून खाक केले. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
कुंडलिक जयराम गराटे हे नेरी येथील रहिवासी असून पांढरवानी येथे त्यांची तीन एकर शेती आहे. त्यांनी धानाचे रोवणे केले आणि कमी पावसात कसेबसे धानपीक जगविले. कर्ज काढून शेती फुलवली. पीक पण जोमात आले. धानाची कापणी करून गुरुवारी पुंजने तयार केले. परंतु अज्ञात इसमाने या पुंजण्याला आग लावली. यात संपूर्ण पुंजणे जळून खाक झाले. यामुळे गरीब शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे. हातात आलेले पीक काही क्षणात जळून खाक झाल्याने त्याच्या कुटुंबावरही मोठा आघात पोहचला आहे. शेती व्यतिरिक्त त्यांच्याकडे उपजीविकेचे दुसरे कुठलेही साधन नाही. शासनाने योग्य चौकशी करून या गरीब शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी व अज्ञात इसमाला पकडून कडक कारवाई करावी, अशी मागणी कुंडलिक गराठे व गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी प्रवीण गंडमवार यांनी घटनास्थळी जाऊन मौका तपासणी व पंचनामा केला. ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान भरपाई दाखवण्यात आली.