बसने विद्यार्थ्याला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:52 PM2019-01-31T22:52:39+5:302019-01-31T22:53:16+5:30
तुकूम येथील कार्मेल अॅकेडमी शाळेत शिकत असलेल्या यशराज चांदेकर (८) या विद्यार्थ्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील खासगी स्मिता ट्रॅव्हल्सच्या स्कूलबसने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दुपारी २.३० वाजता शाळेजवळच घडली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करीत मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तुकूम येथील कार्मेल अॅकेडमी शाळेत शिकत असलेल्या यशराज चांदेकर (८) या विद्यार्थ्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील खासगी स्मिता ट्रॅव्हल्सच्या स्कूलबसने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दुपारी २.३० वाजता शाळेजवळच घडली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करीत मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी केली.
बि. जे. एम. कारमेल अकॅडमी या शाळेची दुपारी २.१५ वाजता सुटी झाली. उर्जानगर वसाहतीत राहणारे विद्यार्थी शाळेबाहेर पडून स्कूल बसची वाट बघत होते. दुपारी २.३० वाजेदरम्यान त्यांची बस शाळाजवळील रस्त्यावर आली. त्या रस्त्यालगत वाळूचा ढिगारा टाकलेला होता. या ढिगाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास अडथळा निर्माण झाला. अशातच यशराज चांदेकर (८) हा विद्यार्थी बसमध्ये चढत असताना तोल जाऊन बसच्या मागील चाकाखाली आला. चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच शाळेत इयत्ता ६ वीत शिकणाऱ्या त्याच्या भावाने याची माहिती आपल्या वडिलांना दिली. या घटनेचे वृत्त पसरताच तिथे मोठी गर्दी झाली. नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.
कुटुंबीयांना ५० लाख
शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सदर घटना शाळेच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचा आरोप करीत बिजेएमने मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मृताच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये तर चंद्रपूर वीज केंद्रानेही २५ लाख आर्थिक मदतीचा धनादेश दिला.