बसस्थानकातील वृक्ष बनले पाहुण्यांसाठी सेल्फी पॉईंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 06:00 AM2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:46+5:30
वसंत खेडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : बल्लारपुरातील अद्ययावत, प्रशस्त आणि देखण्या बसस्थानकाबाबत अनेक वैशिष्टये सांगता येतील. एअरपोर्टसारखे ...
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपुरातील अद्ययावत, प्रशस्त आणि देखण्या बसस्थानकाबाबत अनेक वैशिष्टये सांगता येतील. एअरपोर्टसारखे दिसणाऱ्या या चमचमीत- चकचकीत बसस्थानकावर काही खास सेल्फी स्थळ आहेत. ज्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. त्यात प्रमुख आहेत दोन मोठे देखणे वृक्ष. दिवाळीच्या सुट्यांमध्ये बल्लारपुरात आलेल्या बहुतांश पाहुण्यांनी या वृक्षांसोबत सेल्फी काढून आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.
ज्याला वृक्ष बंधु असे सध्या संबोधले जाते. खरे तर ही वृक्षलाकडं आता बल्लारपूर बसस्थानकाची ओळखच बनून गेली आहेत. बल्लारपूर बसस्थानकाच्या आवारात पिंपळाचे हे दोन विशाल वृक्ष एका कोपऱ्यात उभी होती. या दोनही वृक्षांचे वय असेल ७५-८० वर्षे! बसस्थानकाची नवीन अद्ययावत इमारत उभारणीचे काम सुरू झाले, तेव्हा ही दोन वृक्ष इमारतीच्या कक्षेत येत होते. त्यामुळे या वृक्षांचा अडसर बांधकामात येत होता. त्यावर मग तोडगा काढण्यात आला. ही नैसर्गिक देण तशीच कायम ठेवायची. वृक्षांचा वरचा काही भाग कापायचा आणि वृक्षांची मूळं तशीच कायम ठेवण्यात येवून दोन्ही वृक्षबुंधाभोवती चबुतरे बांधण्यात येवून वृक्षबुंधे आणि चबुतऱ्यांना आकर्षकपणे सजविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाची कल्पकता फळाला आली आणि आज हे दोन्ही वृक्षबुंधे या स्थानकाचे आकर्षण केंद्र ठरले आहेत. बसस्थानकाच्या दर्शनी भागात ही वृक्षबुंधे असल्याने बसस्थानकाचे प्रवेश करताक्षणीच प्रवाशांच्या ही वृक्षबुंधे नजरेत भरतात. मन वेधून घेतात. बाहेरून आलेल्या पाहुण्यांना बल्लारपूरकर बसस्थानक बघायला नेले असता या वृक्षबुंधाच्या वैशिष्टयाबाबत हमखास सांगतात. ही दोन वृक्षबुंधे बल्लारपूर बसस्थानकाची कायमची ओळख बनली आहे.