आंदोलनातून मिळालेले बसस्थानक अडगळीत
By admin | Published: October 1, 2015 01:27 AM2015-10-01T01:27:40+5:302015-10-01T01:27:40+5:30
नागभीड तालुक्याच्या निर्मितीनंतर नागभीडमध्ये एस.टी. आगाराच्या मागणीसाठी एकच मोठे आंदोलन झाले.
घनश्याम नवघडे नागभीड
नागभीड तालुक्याच्या निर्मितीनंतर नागभीडमध्ये एस.टी. आगाराच्या मागणीसाठी एकच मोठे आंदोलन झाले. या आंदोलनातून मिळालेले बसस्थानक आता अडगळीत पडले आहे. तत्कालीन पुढाऱ्यांच्या विवेकशुन्य नियोजनाचा हा परिपाक असून या बसस्थानकाचा वापर अवैध कामासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.
नागभीड हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने नागभीड येथे बस आगार असावे, या मागणीसाठी नागभीड येथे एक मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाची तिव्रता एवढी मोठी होती की आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. बस आगाराच्या मागणीची तिव्रता लक्षात घेऊन या ठिकाणी बसस्थानक मंजूर करण्यात आले. पण येथेही नागभीडकरांचे दुर्दैव आड आले.
बसस्थानकास मंजुरी मिळाल्यानंतर ते पंचायत समितीजवळील रेल्वेच्या जागेत होईल, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा होती. जेणेकरून रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक जवळजवळ होतील आणि ते प्रवाशांच्या सोयीचे होईल. पण झाले उलटेच. सदर बसस्थानक गावाच्या पश्चिमेला आणि तेव्हाच्या निर्जनस्थळी बांधण्यात आले. बसस्थानक बांधण्यात आल्यानंतर पहिली एक दोन वर्ष तिथे बसेस गेल्याही. पण फालतू वेळेचा अपव्यय होत आहे अशी ओरड झाल्यानंतर तिथे बसेस जाणेच बंद झाले. आज लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बसस्थानक अडगळीत पडले आहे. बसस्थानक अडगळीत पडले असले तरी आजही प्रवासी नागपूर-चंद्रपूरला प्रवास करतात, तेव्हा तिकीट आकारणीत या टप्प्याचा विचार करूनच तिकीट आकारल्या जात असल्याची माहिती आहे. म्हणजे उपयोग नसलेल्या या बसस्थानकाचा भूर्दंडही सामान्य नागरिकच सोसत आहेत. जर संपुर्ण विचार करून या बसस्थानकाची निर्मिती रेल्वेच्या जागेत किंवा टी पाईंटवर करण्यात आली असती तर ते नागभीडकरांना अतिशय सोयीचे झाले असते आणि आज अडगळीत पडलेले बसस्थानक पकडून चार ठिकाणी बसथांब्याची निर्मिती करावी लागली, ती करावी लागली नसती. आंदोलनातून मिळालेल्या या बसस्थानकाचा आता कोणताही उपयोग नाही. उलट समाज विघातक शक्तींचे ते आश्रयस्थान बनल्याची चर्चा आहे. येथील नेतृत्वाने या बसस्थानकाचा उपयोग अन्य शासकीय कार्यालयासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी होत असते.