बसस्थानकातील गर्दी झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:38+5:302021-05-12T04:29:38+5:30
खरेदीसाठी पहाटेपासून गर्दी चंद्रपूर : लाॅकडाऊन सुरू आहे. त्यातच सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...
खरेदीसाठी पहाटेपासून गर्दी
चंद्रपूर : लाॅकडाऊन सुरू आहे. त्यातच सकाळी ११ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक भाजीबाजारात पहाटेपासून गर्दी करीत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाहेरगावावरून भाजीपाला, फळे येत असल्याने चिल्लर व्यावसायिक पहाटेच येथे जाऊन भाजी खरेदी करीत आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुविधा द्या
चंद्रपूर : कोरोना काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, फ्रंट वर्करला विमा संरक्षण देण्यात आले आहे. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीच सुविधा नाही. त्यातच विमासुद्धा लागू नाही. अशा वेळीही त्यांना विविध शासकीय कार्यालयात सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळेे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही संरक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्याचे काम करण्याची मागणी
चंद्रपूर : सध्या लाॅकडाऊन सुरू असल्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्याचे सिमेंटीकरण करून दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, रस्त्याची दुरुस्ती करताना अनेकवेळा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र आता रस्ते मोकळे असल्याने रस्त्याचे बांधकाम केल्यास नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.
लाॅकडाऊनमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल
चंद्रपूर : लाॅकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आता कंटाळले आहेत. काही नागरिक सायंकाळच्या वेळी आपल्या सवंगड्यांसोबत चौकांमध्ये गप्पा मारायचे. मात्र आता ते सर्व बंद झाल्यामुळे ते कंटाळले आहेत. त्यातच मंदिरेही बंद असल्यामुळे तिथेही जाता येत नसल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.
शहरातील परकोटाची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये असलेल्या परकोटाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे परकोटाचे अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरातन विभागाने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
जप्त वाहने लिलावाच्या प्रतीक्षेत
चंद्रपूर : महसूल प्रशासनाने मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात रेती जप्त केली आहे. रेती वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने संबंधित मालकांनी दंड न भरल्यामुळे प्रशासनाकडे आहे. त्यामुळे सदर वाहनांचा लिलाव करण्याची मागणी केली जात आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : मागील काही दिवसापासून शहरातील काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वीज विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पथदिव्यांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर: शहरातील बाबूपेठ, लालपेठ काॅलरी, महाकाली वाॅर्ड आदी परिसरातील काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन सदर पथदिवे त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.