निमणी परिसरातील विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:11 PM2019-07-15T23:11:56+5:302019-07-15T23:12:17+5:30
कोरपना तालुक्यातील निमणी मार्गे बसफेरी नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. राजुरा-निमणी-गडचांदूर मार्गे सकाळी सहा व दुपारी बारा वाजता बस सेवा सुरू करण्यासाठी निमणी परिसरातील संतप्त विद्यार्थ्यांनी आज सोमवारी बस डेपो राजुरा येथे एक तास बसेस रोखून धरल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाखर्डी : कोरपना तालुक्यातील निमणी मार्गे बसफेरी नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. राजुरा-निमणी-गडचांदूर मार्गे सकाळी सहा व दुपारी बारा वाजता बस सेवा सुरू करण्यासाठी निमणी परिसरातील संतप्त विद्यार्थ्यांनी आज सोमवारी बस डेपो राजुरा येथे एक तास बसेस रोखून धरल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. राजुराचे पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांनी मध्यस्थी करून एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना नियमित सकाळी ६ व दुपारी १२ वाजता बस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
निमणी परिसरातील हिरापूर, निंबाळा, धुनकी, लखमापूर येथील विद्यार्थ्यांना महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथे ७० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जावे लागते. परंतु सकाळी ६ व १२ वाजता कुठलीही बसफेरी नसल्याने आॅटोला रोज ५० रुपये मोजावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे राजुरा डेपो येथे आंदोलन करावे लागल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असून सकाळी ६ वाजता राजुरा निमणी गडचांदूर तर दुपारी १२ वाजता गडचांदूर निमणी राजुरा नियमित फेरी सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी उपसरपंच उमेश राजूरकर, ग्रा पं सदस्य मारोती कोडापे, माजी उपसरपंच अनिल जगताप, आसिफ सय्यद, प्रफुल्ल काळे, अशोक पोतराजे, जनार्धन सावरकर, लिंगाजी चिंदेकर आदी उपस्थित होते.
निमणी मार्गे सकाळी ६ व दुपारी १२ वाजता बसफेरीची मागणी असून आम्ही १७ जुलैपासून दुपारी १२ वाजताची बस सुरू करीत आहो व पंढरपूर येथील बसेस परत आल्यावर सकाळी ६ वाजताची बस नियमित सुरू करणार.
-एस. तरोडे
विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रपूर.