तालुका ठिकाण असूनही बसेस अनियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:25+5:302021-07-26T04:26:25+5:30
जिवती तालुका हा पहाडावर वसला असून याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. कोविडच्या अगोदर तालुक्यात बसेस नियमितपणे सुरू होत्या. ...
जिवती तालुका हा पहाडावर वसला असून याकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. कोविडच्या अगोदर तालुक्यात बसेस नियमितपणे सुरू होत्या. त्यानंतर कोविडकाळ आला. त्यामुळे बसेस बंद करण्यात आल्या. परंतु सध्या गेल्या महिनाभरापासून साधारण परिस्थिती लक्षात घेता महामंडळाने तालुक्यातील बसेस सुरू करायला पाहिजे. परंतु आगार प्रमुखाचे जिवती तालुक्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे.
सध्या काही शाळा, कॉलेज सुरू झाल्या असून इतर प्रवासीसुद्धा राजुरा, गडचांदूर, चंद्रपूरसारख्या ठिकाणी जाऊ लागले आहेत. मात्र त्यांना खासगी वाहनाने जावे लागते किंवा ताटकळत वाहनांची वाट पाहावी लागते. मग जिल्ह्याचा एक भाग असलेल्या या तालुक्यात बसेस का सोडण्यात येत नाही, असा प्रश्न तालुकावसीयांना पडत आहे. बऱ्याचदा जीवतीसाठी गडचांदूर बसस्थानकावर बसेस लागतात. पण प्रवासी नसल्याचे कारण सांगत वाहक व चालक जिवतीचा फलक बदलवून चंद्रपूर, राजुरा परत जातात. यावरून जिवती तालुक्याकडे कसे दुर्लक्ष करतात, हे दिसून येते.
कोट
जिवती तालुक्यासाठी बस सोडणे म्हणजे महामंडळाला तोटा सहन करणे आहे. या तालुक्यासाठी प्रवासी नसतात. त्यामुळे आमचा डिझेल व कर्मचाऱ्यांचा खर्च निघत नाही. त्यामुळे आम्हाला जिवतीसाठी बस सोडणे शक्य नाही.
- आशिष मेश्राम ,आगार व्यवस्थापक, राजुरा