पोंभुर्णा तालुक्यात अवैध विटा भट्ट्यांचा व्यवसाय

By admin | Published: February 15, 2017 12:48 AM2017-02-15T00:48:01+5:302017-02-15T00:48:01+5:30

वीट भट्ट्यांचा व्यवसाय सुरू करताना परवाना घेऊनच हा व्यवसाय सुरू करावा लागतो. तसेच परिसरात पर्यावरणाला धोकाही निर्माण होऊ नये, ...

Business of illegal bricks furnaces in Pobhurna taluka | पोंभुर्णा तालुक्यात अवैध विटा भट्ट्यांचा व्यवसाय

पोंभुर्णा तालुक्यात अवैध विटा भट्ट्यांचा व्यवसाय

Next

प्रशासनाचे दुर्लक्ष : लाखोंचा महसूल पाण्यात
पोंभुर्णा : वीट भट्ट्यांचा व्यवसाय सुरू करताना परवाना घेऊनच हा व्यवसाय सुरू करावा लागतो. तसेच परिसरात पर्यावरणाला धोकाही निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. मात्र पोंभुर्णा तालुक्यात अनेक ठिकाणी वीट भट्ट्यांचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
पोंभुर्णा तालुक्यात जामतुकूम, देवाडा खुर्द, हत्तीबोडी, झुल्लूरवार तुकूम आदी गावांच्या परिसरात व्यावसायिकांनी विटांचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी दरवर्षी ग्रामपंचायतीकडून व वनविभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतल्यावर हा व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाते. त्यासाठी शासकीय शुल्क घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांकडूनदेखील परवानगी दिली जाते. त्यानंतर काही नियम लक्षात घेऊन मातीचे उत्खनन करावे लागते. महसूल विभागाने भरून घेतलेल्या रॉयल्टीच्या निकषाप्रमाणेच विटाचे उत्पादन काढावे लागते. परंतु वाढीव उत्पादन करून शासनाचा लाखोंचा महसूल व्यावसायिक बुडवित आहेत. त्याच वेळी महसूल विभाग मूग गिळून बसला आहे.
जामतुकूम, डोंगरहळदी, देवाडाखुर्द आदी परिसरात काही ठिकाणी पाच - पाच विटाभट्ट्या लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच ठिकाणी परवाना नाही तर काही ठिकाणी परवान्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त उत्पादन घेतले जात आहे. विटा विक्रीची उलाढाल कोटीमध्ये गेलेली आहे.
एवढा व्यवसाय फोफावला असूनही महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी, ग्रामसेवक, अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणवादी व तालुक्यातील नागरिक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

सात लाख विटांचे उत्पादन
गावालगतच व्यवसाय सुरू असल्याने पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. काही ठिकाणी एकत्र व्यवसाय करून दोन ते तीन लाख विट्टांची परवानगी घेऊन पाच ते सात लाख विटांचे उत्पादन घेत आहे. तालुक्यात १० ते १२ च्या जवळपास व्यावसायिक हा धंदा करीत आहे. विटा विक्रेत्यांकडून जागेवर विटा घेतल्यास एका हजार विटांवर हजार रुपये तर घरपोच जागेवर विटा पोहोचविण्यासाठी चार ते साडेचार हजार रुपये प्रती हजार विटांना भाव आकारला जातो.

सद्या तरी अवैध विटा व्यवसाय आढळून आल्याचे दिसून येत नाही. मात्र तसे आढळल्यास व सदर व्यवसायामुळे पर्यावरणास धोका पोहचत असल्यास आम्ही योग्य चौकशी करून कारवाई करू.
हरीश गाडे,
तहसीलदार, पोंभुर्णा

Web Title: Business of illegal bricks furnaces in Pobhurna taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.