महिलांनी उभारला एलएडी बल्बचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:31+5:302021-04-05T04:24:31+5:30
उमेदच्या सहकार्याने महिला बनल्या आत्मनिर्भर भोजराज गोवर्धन मूल : मनात असलेली जिद्द, चिकाटी आणि काही तरी वेगळे करून दाखविण्याची ...
उमेदच्या सहकार्याने महिला बनल्या आत्मनिर्भर
भोजराज गोवर्धन
मूल : मनात असलेली जिद्द, चिकाटी आणि काही तरी वेगळे करून दाखविण्याची इच्छा असलेल्या मूल तालुक्यातील भादुर्णा येथील महिलांनी पुढे येऊन एलएडी बल्ब आणि स्ट्रिट बल्ब तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे, अतिशय जोखमीचा व्यवसाय करण्यास महिला पुढे सरसावल्याने या नावीन्यपूर्ण उपक्रमाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे.
बचत गटातील वेगवेगळ्या महिला एकत्र येऊन उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ तयार करण्यात आले, त्यातील अनेक महिलांना आपला एखादा व्यवसाय असावा, अशी इच्छा होती, यासाठी मागील वर्षी वर्धा जिल्ह्यातील लोनीगा येथील काही तज्ज्ञ प्रशिक्षक भादुर्णा येथे येऊन १५ महिलांना बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी एक टक्का व्याजाने ग्रामसंघाकडून ३५ हजार रुपयांचे कर्ज काढण्यात आले. ग्रामसंघाच्या अध्यक्ष सुजिया टेकरे, कोषाध्यक्ष रेवता सोनुले यांच्या पुढाकारातून व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सहकार्याने एलएडी बल्ब आणि स्ट्रिट बल्बचा व्यवसाय सुरू केलेला आहे.
बॉक्स
आधी घेतले प्रशिक्षण
जिज्ञासा बल्ब उद्योग सुरू करण्यासाठी भादुर्णा येथील बालीशाही रायपूरे, उषा सत्येकार, सुजिया टेकरे, वनिता वाडगुरे, रेवता सोनुले, शुभांगी बोरूले, अल्का मडावी, वनमाला तोडासे, जयश्री सोनुले, कविता कोवे यांना बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर महिला आता भादुर्णा येथील सामाजिक सभागृहात ५ ते १५ वॅटचे एलएडी बल्ब आणि २४ ते ३६ वॅटचे स्ट्रिट बल्ब बनवित आहे. तयार केलेले बल्ब आयोजित प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी ठेवतात, दुकानदारही महिलांकडून बल्ब घेऊन विक्री करतात. वॅटनुसार बल्बची किंमत ग्रामसंघानी ठरविलेली आहे. महिलांनी उभारलेला हा नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात पहिला आहे. सदर उपक्रमाला मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे यासह अनेक अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपक्रमाची स्तुती केली.
बॉक्स
आधी भीती वाटायची, आता ती दूर झाली : बालीशाही रायपुरे
विजेशी सरळ संपर्क येत असल्यामुळे बल्ब तयार करण्यासाठी आधी मनात भीती वाटत होती, परंतु मागील वर्षभरापासून बल्ब बनविण्याचे काम आम्ही निरंकार करीत असल्याने आता भीती दूर झाली, अशी माहिती जिज्ञासा लाइट उद्योगच्या अध्यक्ष बालीशाही रायपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.