दारुविक्री व खरेदी करायला अवघे गाव सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:01 PM2017-10-23T12:01:22+5:302017-10-23T12:05:26+5:30
अवैध दारुच्या विरोधात जिल्ह्यातल्या वहाणगाव या लहानशा गावातील ग्रामसभेने एक अफलातून पाऊल उचलले आणि ग्रामसभेच्या बैठकीत दारु विक्रीचा ठराव मंजूर करून टाकला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर: अवैध दारुच्या विरोधात जिल्ह्यातल्या वहाणगाव या लहानशा गावातील ग्रामसभेने एक अफलातून पाऊल उचलले आणि ग्रामसभेच्या बैठकीत दारु विक्रीचा ठराव मंजूर करून टाकला. या ठरावानुसार गावातील सर्व स्त्रीपुरुष नागरिकांनी एकत्र येऊन, व ग्रामसभेच्या मदतीने गावातच एक दारुचे दुकान उघडण्याचा व तेथून सर्वांनी दारू विकत घेण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी सकाळी या दुकानाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याने सकाळीच सर्व गावकरी दुकानासमोर जमले होते. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून हे दुकान बंद केले. हा ठराव ग्रामसभेने केला असून त्याला सर्व गावकºयांचा पाठिंबा आहे, त्यामुळे जी कारवाई करायची ती सगळ््याच गावकºयांवर करा असा पवित्रा गावकºयांनी घेतल्याने पोलिसांसमोरही मोठी अडचण निर्माण झाली.
चंद्रपूर जिल्हा हा २०१५ मध्ये दारुबंदी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर येथे दारुच्या अवैध विक्रीला उधाण आले होते. त्यापायी अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. हा सर्व प्रकार रोखावा म्हणून वहाणगाव ग्रामसभेने स्वत:च दारु विकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावकºयांनी दारुविक्रीचा फलकही तयार करून निश्चित केलेल्या दुकानावर तो लावला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा फलकही तोडून टाकला. या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.