चांदाफोर्टवर पोलिसांचे मॉक ड्रील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:19 PM2017-07-29T23:19:54+5:302017-07-29T23:20:22+5:30
चंद्रपुरातील चांदाफोर्ट आणि मूल रेल्वे स्थानक उडवण्याच्या धमकीचे नक्षली पत्र मिळाल्यानंतर पोलीस विभाग सतर्क झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील चांदाफोर्ट आणि मूल रेल्वे स्थानक उडवण्याच्या धमकीचे नक्षली पत्र मिळाल्यानंतर पोलीस विभाग सतर्क झाला आहे. आज शनिवारी चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावर पोलीस विभाग आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्तरीत्या मॉक ड्रिल ( पुर्व सराव ) करीत प्रत्येक अनुचित प्रकाराला हाणून पाडण्यासाठी आम्ही पूर्णत: तयार आहो, हे दाखवून दिले आहे. यात चंद्रपूर पोलीस, श्वान पथक, बॉम्ब डिस्पोजल पथक, रेल्वे पोलीस, आरपीएफ, क्यूआआरटी पथक सहभागी झाले होते.
रेल्वे स्थानक उडवण्याच्या धमकीचे पत्र मिळताच पोलीस विभागाकडून चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन परिसरात मॉक ड्रील घेण्यात आली. कोणतीही अनुचित घटना कशी रोखायची, याचा सराव घेण्यात आला. यात रेल्वे पोलीसही सहभागी झाले होते. धमकीचे पत्र आणि शुक्रवारपासून नक्षल सप्ताह सुरु झाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. अनुचित घटना वेळीच रोखण्यासाठी पोलीस विभाग किती सतर्क आहे, याची तपासणी आज पोलिसांनी चांदा फोर्ट येथे मॉक ड्रीलच्या रुपाने केली. अर्धा तास चाललेल्या या मोहिमेत संपूर्ण परिसर सर्च करण्यात आला. सर्चिंगदरम्यान पोलीस विभागाकडूनच ठेवण्यात आलेले स्फोटक श्वान पथकाने शोधून काढले. त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल टीमने स्फोटक निकामी करीत मॉक ड्रील यशस्वी केली. पोलिसांची सक्रियता व तत्परता तपासण्यासाठी ही मॉक ड्रील घेण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले.