किल्ला संवर्धनाची मोहीम तीव्र
By admin | Published: April 8, 2017 12:43 AM2017-04-08T00:43:01+5:302017-04-08T00:43:01+5:30
‘इको-प्रो’ या स्वयंसेवी संस्थेने चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा गोंड राजाचा किल्ला संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे.
‘इको-प्रो’चा उपक्रम : किल्ला स्वच्छता अभियानाचा ३३ वा दिवस
चंद्रपूर: ‘इको-प्रो’ या स्वयंसेवी संस्थेने चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा गोंड राजाचा किल्ला संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. त्याचा शुक्रवारी ३३ वा दिवस होता. इको्प्रोचे स्वयंसेवक सकाळी ६ ते १० वाजतादरम्यान किल्ला स्वच्छतेसाठी आपला वेळ देऊन श्रमदान करीत आहेत. किल्ल्याची स्वच्छता करून परकोट आणि बुरूजांचे संरक्षण करण्यात येत आहे. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रपूरच्या किल्ल्याचे वैभव जपले जाईल, अशा नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
इको-प्रोने गेल्या १ मार्चपासून ‘भारत स्वच्छता अभियान अंतर्गत’ चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान सुरू केले आहे. पूर्वेकडील पठाणकोट या चंद्रपूरच्या मुख्य प्रवेशद्वारापासून किल्ला स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. पठाणपुरा गेटसह तेथील बुरूजांवरील व भिंतीवर वाढलेली वृक्ष-वेली, झाडी-झुडपे व कचरा स्वच्छता करण्याच्या अभियान नियमित राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पठाणपुरा गेट, बिंबा गेट आणि जटपुरा गेटचा डावा आणि उजवा परिसत पूर्ण स्वच्छ करण्यात आला आहे.
या अभियानाला गती मिळावी, यासाठी २६ मार्चला केंदीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे व पदाधिकाऱ्यांनी अभियानाची माहिती दिली. त्यानंतर पुरातत्व विभागाने चंद्रपूरच्या या किल्लाचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. या ऐतिहासिक वास्तुची योग्य देखरेख होत नसल्याने हा वारसा वृक्ष-वेली, झाडे-झुडपे, धुळीत व कचऱ्यामुळे समाजकंटकाचा अड्डा बनला होता. आता इको-प्रोच्या मोहिमेमुळे हा किल्ला व त्यावरील बुरूजांची जागा स्वच्छ झाली आहे. त्यामुळे बुरूजांवर मुले खेळू लागली आहेत. किल्लाच्या भिंतीजवळ काही भागात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे मोठी झाडे तोडताना इको-प्रोच्या स्वयंसेवकांना त्रास सहन करावा लागत आहे. या अभियानात इको-प्रोचे स्वयंसेवक नितीन बुरडकर, नितीन रामटेके, सुभाष शिंदे, जितेद्र वाळके, बिमल शहा, राजू काहीलकर, रवींद्र गुरनुले, विकील शेंडे, वैभव मडावी, सौरभ शेटये, सचिन धोतरे, मनिष गांवडे आदींसह ४० स्वयंसेवक दररोज सहभागी होत आहेत. (प्रतिनिधी)
पुन्हा बुरूजावर खेळण्याचा मोह
१५-१६ वर्षांपूर्वी पुरातत्व विभागातर्फे किल्ल्याची निगा राखली जात होती. गेल्या १५ वर्षांत मात्र किल्ल्याची दुर्दशा झाल्याची माहिती जटपुरागेट येथील आकाश घोडमारे यांनी दिली. आता किल्ल्याचा परकोट आणि बुरूज स्वच्छ झाल्याने पुन्हा लहान मुलांना त्यावर खेळण्याचा मोह होत आहे. जटपुरा गेट परिसरात मॉर्निंग वॉक करता येईल, अशी स्वच्छता झाली आहे. बिंबा गेट परिसरातील नागरिकांनीही योगा क्लास किंवा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चांगली जागा उपलब्ध झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.