कालवा फुटला, पूरस्थिती बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:01:22+5:30

ही पूरस्थिती आणखी २४ तास कायम राहील, अशी माहिती ब्रह्मपुरीचे प्रभारी तहसीलदार संदीप भांगरे यांनी दिली. किन्ही चौगान येथे असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. आष्टी पुलावर तब्बल चार फूट पाणी आले आहे. आष्टी-चंद्रपूर मार्ग सोमवारीही बंदच आहे. पुराचे पाणी शिवारात शिरल्याने धान, सोयाबीन व इतर खरीप पिके पाण्याखाली आली.

The canal burst, the situation worsened | कालवा फुटला, पूरस्थिती बिकट

कालवा फुटला, पूरस्थिती बिकट

Next
ठळक मुद्देब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांत शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने ब्रह्मपुरी तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरले. रविवारी ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला. सोमवारी चौगान (किन्ही) येथे असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाचा कालवा चार ठिकाणाहून फुटल्याने पूरस्थिती आणखी बिकट झाली आहे. ज्या गावात रविवारी पाणी नव्हते, अशा गावांमध्येही या नहराचे पाणी शिरले. याशिवाय ११ हजार ६२२ हेक्टर पिकांना या पुराचा फटका बसला आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनीही परिस्थितीची पाहणी केली.
ही पूरस्थिती आणखी २४ तास कायम राहील, अशी माहिती ब्रह्मपुरीचे प्रभारी तहसीलदार संदीप भांगरे यांनी दिली. किन्ही चौगान येथे असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. आष्टी पुलावर तब्बल चार फूट पाणी आले आहे. आष्टी-चंद्रपूर मार्ग सोमवारीही बंदच आहे. पुराचे पाणी शिवारात शिरल्याने धान, सोयाबीन व इतर खरीप पिके पाण्याखाली आली. सुमारे हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला. याशिवाय गावात पाणी शिरल्याने नागरिकांचेही मोठे नुकसान झाले.
दरम्यान, कालेश्वर गावाला पुराने वेढले असल्याने व गावात पाणी शिरल्याने तिथे हेलिकॉप्टरद्वारे मदत पुरविण्यात आली. या गावात ७५० फुड पॉकीट आणि ४०० पाण्याच्या बॉटल्स पुरविण्यात आल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला.

दीड हजार नागरिक पुरात
ब्रह्मपुरी : तालुक्यातील पूरग्रस्त गावांमधील दीड हजार नागरिक अडकून पडले आहेत. लाडज या गावाला चारही बाजुंनी पुराने वेढा घातला आहे. येथील ८०० नागरिक अडकून पडले आहेत. यासोबतच बेलगाव येथील १००, खरकाडा येथील ५०, बेटाळा येथील ४०, किन्ही येथील १५० नागरिकांचा समावेश आहे. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आर्मीच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. हे पथक ब्रह्मपुरी तालुक्याकडे रवाना झाले आहे.

पाणी, गॅस व धान्य पुरवठ्यावर परिणाम
ब्रम्हपुरीत सोमवारी गॅस पुरवठा बंद राहणार आहे. मोरे गॅस एजन्सी व पर्वते गॅस एजन्सी शहरात व काही ग्रामीण भागात गॅस पुरविण्याचे कार्य करतात. परंतु बोरगाव व उदापुर गावाचा भाग पुरात बुडाल्याने संबंधित गॅस गोदाम पाण्याखाली आल्याने सोमवारी गॅस पुरवठा बंद राहिला.जीवनावश्यक वस्तूंचे गोडाऊन पाण्याखाली आल्याने धान्य पुरवठयावर परिणाम झाला आहे. नान्होरी पंप हाऊस पुरात बुडाल्याने ब्रम्हपुरीचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. पुराचा सर्वाधिक फटका बेलगाव व लाडज गावांना बसला आहे. या गावातील नागरिकांना रविवारची रात्र जागून काढली लागली. सोमवारी सकाळी दोन फुटांनी पाणी कमी होऊ लागले होते. मात्र कालवा फुटल्याने पुन्हा पाणी पातळी वाढली आहे. शासकीय यंत्रणा, एनडीआरएफचे पथक तालुक्यात अजूनही ठाण मांडून ग्रामस्थांना पुरातून बाहेर काढण्याचे काम करीत आहेत.

ब्रह्मपुरी तालुक्यात २१ गावे प्रभावित
ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी, अºहेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन, गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद्रा, बोळदा, हळदा, मुडझा, एकरा यासह एकूण २१ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या गावांचा संपर्क सोमवारीदेखील तुटलेलाच होता. याशिवाय सावली तालुक्यातील आकापूर, करोली, निमगाव व गोंडपिपरी तालुक्यातील वढोली (बुटी) ही गावेही पुराने वेढली आहेत. या गावांमध्ये अद्याप प्रशासनाकडून मदत पोहचलेली नाही.

गोंडपिपरी-मूल मार्गावरील वाहतूक बंद
वढोली : वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे वढोली अंधारी नदीलाही पूर आला. त्यामुळे वढोली जवळील पुलावरून पाणी वाहत आहे. परिणामी वढोली ते गोंडपिपरी, मूलला जोडणारा मार्ग बंद झाला आहे. शेतामध्ये पाणी शिरल्याने शेकडो हेक्टर शेती संकटात आली आहे.

एक हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले
ब्रह्मपुरी : तालुक्यातील पूरग्रस्त गावात सोमवारीही बचाव पथकाद्वारे मदतीचे कार्य सुरू होते. सोमवारी पुरात अडकलेल्या एक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली.

अडीचशे मेंढ्या व पाच जणांना बाहेर काढले
सावली : तालुक्यातील साखरी घाटावर पुराच्या पाण्यामुळे २५० शेळ्या, मेंढ्या व तीन मेंढपाळांना प्रशासनाने सुखरुप बाहेर काढले. यासोबतच आपल्या शेतात वास्तव्यास असलेल्या पती-पत्नी, दोन बैल, दोन गायी व एका कुत्र्यालाही पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील धनगर समाजाचे मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन साखरी भागात वास्तव्यास होते. अचानक पाणी वाढल्यामुळे मेंढपाळांनी संपर्क साधून सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार व धनगर समाजाचे डॉ. तुषार मर्लावार यांना आपबीती सांगितली. त्यांनी तत्काळ ही माहिती प्रशासनाला दिली. प्रशासनाने मच्छीमार समाजातील लोकांना भेटून पुरात फसलेल्या सर्व लोकांना व जनावरांना बाहेर काढले, अशी माहिती नायब तहसीलदार कांबळे यांनी दिली.

वीज पुरवठा खंडित
सावली: वैनगंगा नदीला पूृर आला आहे. त्यामुळे सावली तालुक्यातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. शिवाय नदीच्या तिरावर असलेल्या निमगाव, दाबगाव मौशी. करोली, वाघोली बुटी. या गावाच्या शेजारी पुराने वेढा घातला आहे. करोली येथील दोन घरांची पडझड झालेली आहे. तसेच निमगावच्या ग्रा. पं कार्यालयात पाणी शीरले आहे. अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Web Title: The canal burst, the situation worsened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.