वरोरा तालुक्यातील कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे
By admin | Published: July 16, 2016 01:18 AM2016-07-16T01:18:51+5:302016-07-16T01:18:51+5:30
तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत आहे. पहिल्याच पावसात कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे पडून पाणी शेतात गेले.
मदतीची मागणी : शेतातील बियाणे वाहून गेले
वरोरा : तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत आहे. पहिल्याच पावसात कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे पडून पाणी शेतात गेले. या पाण्याच्या प्रवाहात शेत जमीन खरडून जात बियाणेही वाहून गेल्याने कॅनल शेजारील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
वरोरा तालुक्यातील २१ गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत असते. या कॅनलमध्ये वर्धा जिल्ह्यातील धरणामधून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. कॅनलमधील पाणी घेऊन शेतकरी सिंचन करीत असतात. कॅनल जुने असल्याने अनेक ठिकाणी क्रॅक झाले आहे, त्याची डागडुजी योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याने दरवर्षी कॅनलला भगदाडे पडून पाणी शेतात जाऊन अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हा कॅनल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी दिवसागणिक शाप ठरत असल्यास याचे आश्चर्य वाटू नये. वरोरा, आर्वी, तुमगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांचे पहिल्याच पावसात कॅनलमुळे मोठ्या प्रमाणात शेतातील नुकसान झाले आहे.
तुमगाव येथील शेतकरी तारानाथ डोये यांच्या शेतानजीक कॅनलला भगदाड पडल्याने त्यांच्या शेतातील बियाणे वाहून गेले. त्यांनी कसलेली जमीनही खरडून गेल्याची तक्रार पाटबंधारे विभागाकडे नुकतीच केली आहे.
पावसापूर्वी कॅनल दुरुस्ती व साफसफाईचे कामे करून हजारो रुपये खर्च केल्यानंतरही कॅनल फुटण्याची डोकेदुखी कायम राहत असल्याने केलेल्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कामाच्या चौकशीची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)