कॅन्सर हॉस्पिटलचे काम एक वर्षात पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:07 AM2019-07-07T00:07:19+5:302019-07-07T00:07:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय तर पुढील दोन वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय तर पुढील दोन वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अद्ययावत इमारतींचे बांधकाम पूर्ण केल्या जाणार आहे, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या डॉक्टर डे कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव डॉ. नजित मवानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पृथ्वीला कोट्यवधी वर्षांचा इतिहास असून सात हजार वर्षांपूर्वी मानवाचा जन्म झाला. पृथ्वीवरील पशुपक्षी निसर्गाला त्रास देत नाही. मानवानेच यात प्लास्टिकसारख्या भस्मासुराला जन्म देऊन वसुंधरेचे वाटोळे करण्यास सुरुवात केली. यावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे, असे नमूद करत पाडेवार यांच्या वेस्ट टू बेस्ट प्रात्यक्षिकाचे त्यांनी कौतुक केले. कचरा वेचून विक्री करून जमा केलेले पैसे प्रधानमंत्री सहाय्यता निधीत जमा करणाऱ्या मुलींचाही पालकमंत्र्यांनी सत्कार केला. डॉ. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.
आशिया खंडातील नावीन्यपूर्ण इमारती
आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण इमारत चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आणि बंगळुरूच्या धर्तीवर विसापुरात बॉटनिकल गार्डन उभारले जात आहे. जिल्ह्याला कौशल्य संपन्न करण्यासाठी विविध योजना सुरू झाल्या.३३ कोटी वृक्षलागवड अभियानातून वन समृद्ध होणार आहे.