टाटा ट्रस्टच्या सहकार्याने चंद्रपुरात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:41 AM2017-10-19T00:41:58+5:302017-10-19T00:42:09+5:30
चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांसाठी १०० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपुरात उभारण्यात येणार असून वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने......
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांसाठी १०० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपुरात उभारण्यात येणार असून वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे कॅन्सर हॉस्पीटल पुढील वर्षी जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे.
मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.हसनाबादे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. गजानन कांबळे, टाटा ट्रस्टच्या कॅन्सर विभागाचे ऋषभ कनोडीया, लक्ष्मण सेतुरामन, गणेश निलम, अनमोल रेले आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पीटल उभारण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्हयात कॅन्सर रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची आवश्यकता ना. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादित केली. टाटा ट्रस्ट, चंद्रपूर जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालय उभारण्यात येणार आहे. रुग्णालयाची इमारत जिल्हा प्रशासनातर्फे तर यंत्र सामुग्री, मार्गदर्शन आणि तज्ज्ञ याबाबतची जवाबदारी टाटा ट्रस्टतर्फे घेतली जात आहे. अशा पध्दतीचे कॅन्सर हॉस्पीटल आसाम राज्यात टाटा ट्रस्टतर्फे उभारण्यात आले आहे.
या कॅन्सर हॉस्पिटलसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन, टाटा ट्रस्ट व संचालक वैद्यकीय शिक्षण यांच्यात सामंज्यस कराराचा नमुना तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. इमारत बांधकाम आणि पायाभुत सुविधा राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्षीय पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर्सना कॅन्सर उपचारा संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टाटा मेमोरियल हॉस्पीटल मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात येत्या वर्षभरात हे कॅन्सर हॉस्पीटल उभे राहणार असून त्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांना उपचाराची मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
सधन शेतकरी प्रकल्प
चंद्रपूर जिल्हयातील मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर, जिवती, गोंडपिपरी आणि नागभीड या तालुक्यांमध्ये टाटा ट्रस्टच्या सहकार्याने सधन शेतकरी प्रकल्प राबविण्यात येणार असून टाटा ट्रस्टची चमू या तालुक्यांमध्ये सुक्ष्म नियोजनाचे तसेच माहिती संकलनाचे काम करणार आहे. शेतकºयांचे पीक उत्पन्न वाढावे, कुकूट पालन, शेळी पालन, डेअरी क्लस्टर, फलोत्पादन, सुक्ष्म सिंचन या सुविधा उपलब्ध करुन देत शेतकºयांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या सधन शेतकरी प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.