वेकोलि रुग्णालयात कॅन्सर तपासणी व निदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:40 AM2021-02-26T04:40:22+5:302021-02-26T04:40:22+5:30
राजुरा : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय रुग्णालयात कॅन्सर रोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राचे ...
राजुरा : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय रुग्णालयात कॅन्सर रोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय कल्याण समिती व शिवानी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी शिवानी महिला मंडळाच्या अध्यक्ष अनिता डे होत्या. शिबिराचे उद्घाटन क्षेत्रीय रुग्णालयाचे चिकित्सा अधिकारी डॉ. ओबेश अली यांनी केले. यावेळी डॉ. पवन कुमार, डॉ. चंद्रशेखर, डॉ. मयूर दायगावते, शिवानी महिला मंडळाच्या उपाध्यक्ष वंदना सिंग, सचिव उमा विश्वनाथन, परिहार, बारला, अली, मेट्रन प्रमुख सिस्टर प्रिसील्ला, गीता पाटील, क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य जी. रामलू, रामचंद्र यादव, संजय सालवे, रघुराम व्यासपीठावर उपस्थित होते.
सूत्रसंचालन मेट्रन शशी आर. मसीह यांनी केले. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर संस्थेचे कन्सल्टंट डॉ. मयूर दायगावते यांनी कर्करोगाच्या आजाराची लक्षणे व उपचार पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. सहा तास चाललेल्या या शिबिरात कॅन्सर रुग्णालयाच्या चमूने एकूण ७० महिलांची तपासणी केली. त्यातील दोघींना पुढील तपासणी व उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. या शिबिराचा लाभ वेकोलितील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांनी घेतला.