चंद्रपुरात आठ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:37 AM2017-07-29T00:37:52+5:302017-07-29T00:38:25+5:30
मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुंबईच्या घाटकोपर (पश्चिम) येथील चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून चंद्रपूर शहरातही अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून चंद्रपुरातील अशा निर्लेखित इमारतींची माहिती घेतली असता चंद्रपुरात केवळ आठच इमारती जीर्ण असल्याची माहिती मिळाली. या इमारत मालकांना केवळ नोटीस बजाविण्यापलिकडे मनपाने काहीही केलेले नाही. त्यामुळे मुंबईसारखी घटना घडल्यास अनेकांना प्राण गमवावे लागण्याची शक्यता आहे.
धोकादायक व जीर्ण इमारतींबाबत दरवर्षी स्थानिक प्रशासनाकडून सर्व्हेक्षण केले जाते. याशिवाय नागरिकांच्या तक्रारीवरूनही धोकादायक इमारतींची नोंद केली जाते. मात्र चंद्रपूर महानगर पालिकेने यावर्षी धोकादायक व जीर्ण इमारतींचे सर्व्हेक्षणच केले नसल्याची माहिती आहे. नगर रचनाकार विभागात याबाबत माहिती जाणून घेतली असता, शहरात केवळ आठच इमारती धोकादायक असून त्या इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.
मनपाने हा आकडा सांगितला असला तरी प्रत्यक्षात शहरात स्थिती वेगळी आहे. शहरात आठपेक्षा अधिक इमारती कालबाह्य आणि धोकादायक झाल्याचे शहरात फेरफटका मारला असता दिसून येते. काही इमारतींच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत तर काही लहानसहान घरांचे छत कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
महानगरपालिकेच्या सर्व्हेक्षणात केवळ आठ इमारतीच धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. या इमारत मालकांना नोटीस बजावल्यानंतर घरमालकाने काय कार्यवाही केली, त्यांनी केली नसेल तर महापालिकेने काय कार्यवाही केली, अशी विचारणा केली असता, दोन वर्षांपूर्वी एक-दोन धोकादायक इमारती पाडण्यात आल्या होत्या. मात्र दोन वर्षांत अशी कार्यवाही झाली नसल्याचे सांगण्यात आले.
भिंत कोसळून गेला होता बळी
सोमवारी सकाळी खर्रा घेण्यासाठी प्रियदर्शिनी चौकातील पानटपरीवर उभ्या असलेल्या कैलास डोंगी (२४) नामक युवकावर पानटपरीला लागून असलेली सुरक्षा भिंत कोसळली होती. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही भिंतही जीर्ण झाली होती. याशिवाय शहरात अनेक अशा भिंती जीर्ण झालेल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने या भिंती केव्हाही कोसळून अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.
मनपाचे दुर्लक्ष
काही इमारतींचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने ती इमारत धोकादायक असतानाही पाडता येत नसल्याचे नगर रचनाकार विभागाने सांगितले. शहरात तीन झोन कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी धोकादायक इमारतींची एकत्रित माहितीच मनपाकडे उपलब्ध नसल्याचेही यावेळी दिसून आले. स्ट्रक्चरल आॅडिट संदर्भात विचारणा केली असता, माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धोकादायक इमारतींविषयी मनपा किती दक्ष आहे, हे दिसून येते.