प्रचारासाठी उमेदवार करत आहेत खास फोटो शूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 10:58 AM2019-10-10T10:58:38+5:302019-10-10T10:59:04+5:30
खादीचा पांढरा कुर्ता आणि पायजमा...त्यावर जॅकेट...असा राजकीय नेत्याला साजेसा पेहराव करून उमेदवार खास पोर्टफोलिओ शूट करून घेत आहेत.
राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खादीचा पांढरा कुर्ता आणि पायजमा...त्यावर जॅकेट...असा राजकीय नेत्याला साजेसा पेहराव करून उमेदवार खास पोर्टफोलिओ शूट करून घेत आहेत. इतर उमेदवारांपेक्षा आपला प्रचार हटके आणि वेगळा व्हावा, यासाठी सगळे कामाला लागले असून सध्या वेगवेगळ्या थीमनुसार पोर्टफोलिओ शूट जोमाने सुरू आहेत. प्रचार फलकासह सोशल मीडियावर आपली छबी उठून दिसावी, यासाठी खास व्यावसायिक छायाचित्रकारांकडून पोर्टफोलिओ शूट करवून घेतला जात आहे. पोर्टफोलिओ शूटसह त्यांच्याकडून प्रचार रॅली, भेटीगाठींचे क्षण, प्रचार सभा यांची छायाचित्रेही काढून घेतली जात असल्याने सध्याला व्यावसायिक छायाचित्रकार जोमात आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारांचा कल पोर्टफोलिओ शूटकडे वाढला आहे. आऊटडोरपेक्षा उमेदवाराच्या बंगल्यात, घरात किंवा स्टुडिओमध्ये हे पोर्टफोलिओ शूट केले जात आहेत. काही उमेदवारांनी तर विजयी झाल्याचे पोर्टफोलिओदेखील शूट केले आहेत. या कामात दोन ते तीन जणांची टीम पूर्ण सेटअपसह छायाचित्रे काढून देत आहेत.
दैनंदिन प्रचाराचेही छायाचित्रण
रोजच्या प्रचाराची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली जात आहेत. प्रचार रॅली, भेटीगाठी, प्रचार सभा आणि मतदारांशी संवाद, असा उमेदवारांच्या प्रचाराचा प्रत्येक क्षण छायाचित्रकार शूट करून देत आहेत. ही रोजची छायाचित्रे फेसबुक, इन्स्ट्राग्राम आणि टिष्ट्वटरवर टाकले जात असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही छायाचित्रे पाठवली जात आहेत.
सोशल मीडियासाठी खास शूट
फेसबुक अकाऊंट, फेसबुक पेज, इन्स्ट्राग्राम पेज, टिष्ट्वटर अकाऊंट आणि उमेदवाराचे संकेतस्थळ, यासाठीच्या डीपीसाठी आणि कव्हर पिक्चरसाठी पोर्टफोलिओ शूटची मागणी जास्त आहे. रोज नवनवीन डीपी ठेवता यावेत आणि त्यातून आपला वेगळ्या पद्धतीने प्रचार व्हावा, यासाठी हे शूट करण्यात येत आहेत.