अजेंडा पोहचविण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा, झेलत आहे ऊन, वारा अन् पावसाचा मारा
By साईनाथ कुचनकार | Published: April 13, 2024 02:58 PM2024-04-13T14:58:08+5:302024-04-13T14:58:37+5:30
प्रचारासाठी अवघे चार दिवसच शिल्लक असल्याने ऊन असो की पाऊस, कोणत्याही स्थितीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सभा, बैठका, प्रचारदौरे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काही दिवस तप्त उन्हात घामाच्या धारांमध्ये प्रचार केल्यानंतर आता अकाली पावसामध्ये भिजून प्रचार करण्याची वेळ उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवसच शिल्लक असल्याने ऊन असो की पाऊस, कोणत्याही स्थितीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचे तापमान ४२ अंशापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच घाम सुटला होता. दुपारच्या वेळी प्रचार करताना चांगलीच दमछाक होत होती. मात्र आता वातावरणात बदल झाला आहे. ऊन-सावलीचा खेळ सुरू असतानाच ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. गुरुवार, शुक्रवारी काही ठिकाणी तर शनिवारी पहाटे विजांच्या कडकडाटांसह पाऊस कोसळला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरण बदलले तरीही आपला अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचावा, म्हणून उमेदवार ऊन, वारा अन् पाऊस या तिन्ही स्थितीचा सामना करीत प्रचाराला लागले आहेत.
वातावरणाच्या बदलामुळे निवडणुकीच्या नियोजनाचे मात्र तीन तेरा वाजू लागले आहेत. मुळातच प्रचाराला वेळ कमी असताना बदलत्या वातावरणामुळे उमेदवार व त्यांचे समर्थक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
१५ उमेदवार रिंगणात
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा आणि १६ तालुक्यांचा समावेश आहे. विस्ताराने मोठे असलेल्या या क्षेत्रामध्ये विविध राजकीय पक्षांसह १५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख पक्षांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून काहींचे तर अजूनही मतदारांना नाव किंवा चिन्ह सुद्धा माहीत नसल्याची स्थिती आहे.
चार दिवसांपूर्वी पारा ४२ अंशावर
सर्वाधिक उष्ण शहरामध्ये राज्यातच नाही तर देशात चंद्रपूरचे नाव आहे. मार्च महिन्यापासूनच ऊन तापायला लागले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर पारा ४२ अंशापर्यंत पोहचला होता. त्यामुळे उन्हाच्या झळा नागरिकांना बसल्या. दरम्यान, आता ढगाळ वातावरण तसेच अकाली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.