नगरसेवक होण्यासाठी उमेदवारांची पायपीट

By admin | Published: October 26, 2015 01:13 AM2015-10-26T01:13:01+5:302015-10-26T01:13:01+5:30

जिंदाबाद... जिंदाबाद... विजयी करा... अशा घोषणा देत कार्यकर्ते सध्या जीव ओतून प्रचाराचे काम करीत आहेत.

Candidates of candidates to be Corporators | नगरसेवक होण्यासाठी उमेदवारांची पायपीट

नगरसेवक होण्यासाठी उमेदवारांची पायपीट

Next

मतदारांशी वैयक्तिक संपर्क : प्रचार फेऱ्यांना आला जोर
खडसंगी: जिंदाबाद... जिंदाबाद... विजयी करा... अशा घोषणा देत कार्यकर्ते सध्या जीव ओतून प्रचाराचे काम करीत आहेत. नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच पक्षाच्या उमेदवाराना जिवाचे रान करावे लागत आहे. मतदान होईपर्यंत प्रत्येक उमेदवाराला दररोज सकाळ सायंकाळ प्रभागाच्या कमीत कमी चार- पाच फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे उमेदवारांवर आपला प्रचार व भूमिका मांडण्यासाठी पर्यायाने नगरसेवक होण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.
नव्यानेच निर्माण झालेली चिमूर नगरपरिषदेची प्रथमत: सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने पहिला नगरसेवक होण्याचा मान मिळावा व आपल्या नावाची इतिहासात नोंद व्हावी, यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. मतदारांशी संपर्क साधण्यात जो कुचराई दाखवील, त्याला विजयापासून दूर राहावे लागण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी मैदानातील प्रत्येक उमेदवाराला दररोज दिवसभर कमीत कमी पाच-सहा किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे.
ऐन सणासुदीच्या दिवसांत नगरपरिषदेना रणसंग्राम भरात आला असून आपले नाव लोकापर्यंत पोहोचावे, आपल्या पक्षाची भूमिका त्यांना कळावी यासाठी मतदारांपर्यंत वैयक्तिकरीत्या संपर्क साधण्यास सर्वांचे प्राधान्य आहे. यासाठी ‘डोअर टू डोअर’ तसेच वसाहतीमधील प्रत्येक चौकापर्यंत पोहोचण्याचे नियोजन उमेदवारांकडून केले जात आहे. पण हे करताना उमेदवारांना घाम गाळावा लागत आहे. कारण आधुनिक युगात ऊठसूठ गाड्या घेऊन जाण्याच्या सवयीमुळे अनेकजण पायदळ चालणेच विसरले आहेत. त्यामुळे काही अंतर जरी चालले तरी अनेकांना दम लागत आहे.
विजयासाठी एक-एक मतांचे मूल्य असल्याने उमेदवारांना कार्यकर्त्यांना दूरवरची प्रचाराची फेरी काढण म्हणजे एक दिव्यच ठरत आहे. सत्तेसाठी प्रचार करावाच लागणार असल्याने अनेक पुरुष-महिला उमेदवारांनी नास्ता, शीतपेय यांची सोय केली आहे. त्यामुळे प्रचारातील कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहण्यास मदत होत आहे. काही जण थंडगार पाण्याच्या बाटल्याही सोबत घेत आहेत.
चिमूर नगरपरिषदेसाठी लोकसंख्या कमी पडत असल्याने ११ गावांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे नगरपरिषदेचा ११-११ किलोमीटरचा परिसर पडतो. यामध्ये १७ प्रभाग विभागले आहेत. त्यामध्ये अनेक प्रभाग विस्तारलेले आहेत. एका प्रभागात हजार ते पंधराशे मतदार आहेत. त्यामुळे एक प्रभाग दिड ते दोन किलोमीटरच्या परिघात विस्तारलेला आहे. मतदारापर्यंत पोहचताना उमेदवाराना शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
प्रचारासाठी सध्या सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर होत असला तरी पारंपरिक फेऱ्याचे आजही महत्त्व कायम आहे. (वार्ताहर)

Web Title: Candidates of candidates to be Corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.