Candrapur: एक कोटीने फसवणूक करणारा जाळ्यात, सावली पोलिसांची कारवाई
By परिमल डोहणे | Published: May 29, 2023 11:33 PM2023-05-29T23:33:15+5:302023-05-29T23:33:50+5:30
Crime News: बनावट कागदपत्रे तयार करून मूल येथील श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेतून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार मागील अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आला होता.
- परिमल डोहणे
चंद्रपूर : बनावट कागदपत्रे तयार करून मूल येथील श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेतून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार मागील अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी मागील अडीच वर्षांपूर्वीपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात सावली पोलिसांना यश आले आहे. राजेश वसंतराव राईंचवार (५५) रा. सावली असे मागील अडीच वर्षांपासून फरार असलेल्या अटकेतील आरोपीचे नाव आहे. यातील दोन आरोपींना यापूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेच्या बॅंक व्यवस्थापकांनी कर्जदार सरिता राजेश राईंचवार, जमानतदार राजेश वसंत राईंचवार, मूल्यांकनकर्ता सचिन चिंतावार यांनी संगनमत करून खोटे व बनावट दस्तऐवज तयार करुन बॅंकेची एक कोटीने फसवणूक केल्याची तक्रार सावली पोलिसात केली होती. या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला. न्यायालयांनी कर्जदार सरिता राजेश राईंचवार व मूल्याकनकर्ता यांना जामीन मंजूर केला होता. परंतु, अडीच वर्षांपासून मुख्य आरोपी असलेले राजेश राईंचवार फरार होते.
दरम्यान, २४ मे रोजी राजेश राईंचवार हे एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असल्याची माहिती सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अशी केली फसवणूक
१० मार्च २०१६ रोजी राजेश राईंचवार याने आपल्या पत्नीच्या नावाने श्री कन्यका नागरी बॅंकेत व्यवसायासाठी ७५ लाख रुपये कर्जासाठी अर्ज केला होता. १७ मार्च रोजी त्यांनी अर्जासह सातबारा, मूल्यांकन अहवाल, कर्जदार व जमानतदार यांच्या सह्यांचे नमुना कार्ड इतर आवश्यक दस्तावेज दिले. दरम्यान, ७ डिसेंबर २०१६ रोजी पुन्हा बॅंकेत कर्जमर्यादा ५० लाखाने वाढवून देण्याची मागणी केली. तेव्हा बॅंकेने २५ लाख रुपये वाढीव कर्ज मंजूर करुन एकूण एक कोटींचे कर्ज दिले. काही दिवस त्यांनी कर्जाचा भरणा नियमित केला. त्यानंतर ते कर्ज थकीत होते. बॅंकेने त्यांना नोटीस दिली होती. तरीही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे बॅंकेने कर्जाचा भरणा न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जप्तीची कार्यवाही केली. यावेळी तारण संपत्तीचा पंचनामा केला असता, तारण संपत्ती प्रत्यक्षात दिसून आली नाही. याबाबत कर्जदार व मूल्यांकक यांना विचारणा केली असता, उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गुन्हा दाखल केला होता.