चंद्रपुरात बनावट नंबरची कार जप्त
By admin | Published: January 11, 2017 12:36 AM2017-01-11T00:36:01+5:302017-01-11T00:36:01+5:30
परिवहन विभागाकडे नोंदणी न करताच गेल्या सात वर्षांपासून रस्त्यावर धावणारी कार चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूने मंगळवारी जप्त केली.
चंद्रपूर : परिवहन विभागाकडे नोंदणी न करताच गेल्या सात वर्षांपासून रस्त्यावर धावणारी कार चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूने मंगळवारी जप्त केली. एम.एच. ३४ एए ४०९६ असे बनावट नंबर लिहून गेल्या सात वर्षापासून इंडीगो कार रस्त्यावर धावत होती.
गेल्या सात वर्षांपासून नोंदणी न करताच कार रस्त्यावर धावत असल्याची गोपनिय माहिती चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चमूला मिळाली. या माहितीच्या आधारे चंद्रपूरचे मोटार वाहन निरीक्षक परिक्षीत पाटील, सहायक मोटार वाहन निरीक्षक लेदाळे, चौधरी व वाहनचालक चौधरी या चौघांच्या चमूने वरोरा नाक्यावरील नवीन उड्डाणपुलाजवळ शेमदेव बालाजी दोडके रा. चंद्रपूर या कार चालकाला थांबवून कारची चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे कागदपत्र आढळून आली नाही. त्यामुळे कार पोलीस वाहतूक शाखेत जप्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, कारवर असलेला एम.एच. ३४ एए ४०९६ हा क्रमांक चंद्रपूर जिल्ह्यातीलच असला तरी या क्रमांकाची स्वीफ्ट डिझायर ही कार सर्व कार्यवाही करून औरंगाबाद जिल्ह्यात वळती करण्यात आली आहे. मात्र याच नंबरवर इंडीगो कंपनीची कार चंद्रपुरात धावत होती. ही कार जेव्हा खरेदी करण्यात आली, तेव्हा परिवहन विभागाकडे कोणतीही नोंदणी किंवा टॅक्स भरण्यात आलेले नाही. गोपनिय माहितीवरून शेमदेव दोडके यांच्याकडून ही कार जप्त करण्यात आली असून कारचे कागदपत्र सादर करण्यासाठी त्यांना सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
व्याजासह भरावे लागणार टॅक्स
जप्त करण्यात आलेली कार सोडविण्यासाठी कार मालकाला सात वर्षाचा कर व्याजासह भरावे लागणार आहे. तसेच नोंदणी व इतर कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच कार सोडली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.