हायवाने अर्धा किमीपर्यंत कारला फरफटत नेलं, वैद्यकीय अधिकारी दाम्पत्याचा मृत्यू

By राजेश भोजेकर | Published: March 22, 2023 09:35 PM2023-03-22T21:35:24+5:302023-03-22T21:42:31+5:30

वरोरा-वणी मार्गावरील शेंबळ गावाजवळील भीषण अपघात

car was blown by truck half km, medical officer the couple died | हायवाने अर्धा किमीपर्यंत कारला फरफटत नेलं, वैद्यकीय अधिकारी दाम्पत्याचा मृत्यू

हायवाने अर्धा किमीपर्यंत कारला फरफटत नेलं, वैद्यकीय अधिकारी दाम्पत्याचा मृत्यू

googlenewsNext

वरोरा (चंद्रपूर) : वरोरा-वणी मार्गावरील शेंबळ गावाच्या शिवारात भरधाव हायवा ट्रकने कारला समोरून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये हायवाने कारला अर्धा किमी अंतरापर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमधील वैद्यकीय अधिकारी असलेले दाम्पत्य ठार झाले. हा अपघात बुधवार, दि. २२ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला. अतुल गौरकार (वय ३४) व त्यांच्या पत्नी अश्विनी गौरकार (३१, रा. दीनदयाल सोसायटी, तुकुम, चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.

अतुल गौरकार हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपजिल्हा रुग्णालय, तर अश्विनी या यवतमाळ जिल्ह्यातील वणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. वरोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हायवा ट्रक ताब्यात घेऊन चालक अभिमन्यू साकेत (२५, मूळचा मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम शेंबळ) याला अटक करण्यात आली आहे. नागरिकांकडून याबाबत हळहळ व्यक्त होत होती. प्राप्त माहितीनुसार, अतुल गौरकार व त्यांच्या पत्नी अश्विनी हे दोघेही चंद्रपूरहून कार (एमएच ३४ एएम ४२४०)ने वरोरा नजीकच्या बायपास मार्गाने वणीकडे जात होत होते.

वरोरा तालुक्यातील शेंबळ शेतशिवारात समोरून भरधाव वेगात आलेल्या हायवा ट्रक (एमएच ३४ बीझेड २९९६)ने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हायवा ट्रकने कारला अर्धा किमीपर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमध्ये असलेले गौरकार दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाले. कारमध्ये दोघेही अडकून पडले होते. घटनास्थळी धावून आलेल्या लोकांनी त्यांना मोठ्या कसरतीने बाहेर काढले. मात्र, अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला होता.

गंभीर जखमी असलेले अतुल गौरकार यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, वाटेतच भद्रावतीजवळ त्यांचीही प्राणज्योत मालवली. अतुल आणि अश्विनी यांना एक वर्षाचा शेरवीर हा मुलगा आहे. आई-वडिलांवर अचानक काळाने घाला घातल्याने हा चिमुकला पोरका झाला आहे. या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.

अश्विनी या वैद्यकीय अधिकारी
अश्विनी गौरकार या वणी येथील उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी एकच दिवस सेवा दिल्याची माहिती त्यांच्या आप्तेष्टांनी दिली.

दैव बलवत्तर म्हणून शेरवीर बचावला
अपघातात ठार झालेल्या गौरकार दाम्पत्याला एक वर्षाचा शेरवीर नावाचा मुलगा आहे. तिघेही चंद्रपूरला आले होते. अतुल आणि अश्विनी यांनी चंद्रपूरला आपल्या घरी आजोबाकडे चिमुकल्याला ठेवून वणीला जाऊन येतो म्हणून गेले होते, अशी चर्चा सुरू आहे. काळ दबा धरून बसला होता. या अपघातात दोघेही ठार झाले. सुदैवाने चिमुकला शेरवीर यातून बचावला. दैव बलवत्तर म्हणून शेरवीर बचावल्याची चर्चाही समाजमाध्यमांवर आहे.

Web Title: car was blown by truck half km, medical officer the couple died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.