‘पोलीस सारथी’ घेणार महिला व मुलींची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:48 PM2019-01-28T22:48:37+5:302019-01-28T22:48:58+5:30
काही कारणास्तव एखाद्यावेळेस महिला व मुलींना रात्री, मध्यरात्री बाहेर पडावे लागते. अशावेळेस अनेक महिला व मुलींना छेडखाणीच्या प्रकाराला सामोर जावे लागत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र आता चंद्रपूर पोलिसांनी ‘पोलीस सारथी’ हा उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाद्धारे रात्री १० ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान संकट ओढावलेल्या स्त्रियांनी पोलिसांना फोन व मॅसेजद्वारे माहिती दिल्यास पोलीस आपल्या वाहनात बसवून त्यांना घरी सोडणार आहेत. या उपक्रमाचे शनिवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काही कारणास्तव एखाद्यावेळेस महिला व मुलींना रात्री, मध्यरात्री बाहेर पडावे लागते. अशावेळेस अनेक महिला व मुलींना छेडखाणीच्या प्रकाराला सामोर जावे लागत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र आता चंद्रपूर पोलिसांनी ‘पोलीस सारथी’ हा उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाद्धारे रात्री १० ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान संकट ओढावलेल्या स्त्रियांनी पोलिसांना फोन व मॅसेजद्वारे माहिती दिल्यास पोलीस आपल्या वाहनात बसवून त्यांना घरी सोडणार आहेत. या उपक्रमाचे शनिवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
रात्री बसस्थानक, रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी महिला आणि मुली अनेकदा अडकतात. अशा वेळेस त्यांना मदत मिळत नाही. विशेषत: त्यांच्याकडे घरापर्यंत पोहोचण्यासाठी साधन उपलब्ध नसते. अशा परिस्थिती एखादा अनोळखी व्यक्तीकडून मदत मागणे धोकादायक ठरु शकते. मदतीच्या बाहाण्याने महिलांवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थिती रात्रीच्या सुमाराला संकटात अडकणाऱ्या महिलांना सुरक्षेचा विश्वास आणि संरक्षणाची हमीसाठी चंद्रपूर पोलिसांनी पोलीस सारथी उपक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला अािण मुली उपस्थित होत्या. ही योजना जिल्हाभरात राबविली जाणार आहे. यासाठी पोलीस दलास सहा अतिरिक्त वाहन दिले जाईल, असे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. सध्या उपलब्ध वाहन आणि संसाधनातच ही योजना राबविली जाणार आहे.
मदतीसाठी क्रमांक
रात्री १० ते सकाळी ५ या दरम्यान संकटात सापडलेल्या महिला आणि मुलींना मदत हवी असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक (०७१७२-२५१२००, २६३१००, २७३२५८), महिला हेल्पलाईन (१०१९) आणि व्हॉट्सअॅप (९४०४८७२१००) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संकटातील महिलांना पोलीस घरापर्यंत सोडून देईल. हा याच योजनेचा हेतू आहे.