खासगी डॉक्टरांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा पांगळी
By admin | Published: January 18, 2015 11:18 PM2015-01-18T23:18:19+5:302015-01-18T23:18:19+5:30
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय आहे. यातील बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध आहे. रुग्णालयात बॉम्बे नर्सिंगहोम अॅक्टनुसार सुविधा असणे गरजेचे
चंद्रपूर : शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय आहे. यातील बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध आहे. रुग्णालयात बॉम्बे नर्सिंगहोम अॅक्टनुसार सुविधा असणे गरजेचे असतानाही याकडे पद्तशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेकडे संबंधित अधिकारीच उपलब्ध नसल्याने सध्या शहरातील खासगी रुग्णलयाचे फावत आहे.
चंद्रपूर शहरामध्ये ५० च्यावर खासगी रुग्णलयांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहे. या रुग्णालायापैकी काही सोडल्या तर बऱ्याचशा रुग्णालयामध्ये अग्निशमन यंत्रणा नाही.
एखाद्यावेळी आगीसारखी घटना घडल्यास आगीवर नियंत्रण मिळणार तरी कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काही डॉक्टरांनी मात्र ही यंत्रणा बसवून आपली सुरक्षा केली आहे. या डॉक्टरांचे तरी किमान अनुकरण करणे अपेक्षित आहे. मात्र असे होताना दिसत नाही. वर्षानुवर्षांपासून रुग्णालयातून रुग्णसेवेचा व्यवसाय करणाऱ्या या डॉक्टरमंडळींकडून बॉम्बे नर्सिंगहोम अॅक्टचे उल्लंघन होत आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास कुणीच समोर येताना दिसत नाही. महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी खासगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांची होती. मात्र मनपा अस्तित्वात आल्यानंतर ही सर्व जबाबदारी महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाकडे आली आहे. या विभागाने शहरातील खासगी रुग्णालयाची तपासणी करणे, सोयीसुविधा तपासणे अपेक्षित आहे. तसा अहवालही द्यावा लागतो. मात्र संबंधित विभागातच वैद्यकीय अधिकारी वर्ग एकचे पदच अद्यापही भरले नसल्याने नियंत्रण करायचे कुणी? असा प्रश्न उपस्थीत होत आहे.
शहरातील काही रुग्णालयाची स्थिती भयावह आहे. रुग्णालयापर्यंत साधी रुग्णवाहिकाहीसुद्धा पोहचू शकत नाही. असे अनेक रुग्णालय अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे, ज्या रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचू शकत नाही तिथे एखाद्यावेळी आग लागल्यास फायर ब्रिगेडची गाडी कशी पोहचणार हे समजण्यापलिकडे आहे.
उच्चशिक्षण घेतलेल्या डॉक्टर मंडळीकडून जिल्ह्यातील नागरिकांना सेवा मिळत आहे. ही आनंदाची बाब असली तरी डॉक्टरांकडून नियमांचे उल्लंघन होणे त्यांच्या प्रतिष्ठेसाठी शोभणारी बाब नक्कीच नाही. (लोकमत चमू)