धावत्या एसटीत असतानाच वाहकाचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:00 AM2021-03-04T05:00:00+5:302021-03-04T10:30:42+5:30
चिमूर आगारात कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाने १ मार्च रोजी सरकारी दवाखाना चिमूर येथे कोरोना चाचणी केली. मात्र तरीसुद्धा त्याला कर्तव्यावर पाठविण्यात आले. २ मार्च रोजी उरकुटपार या मार्गावर मानव विकास सेवेच्या विद्यार्थ्यांच्या बसवर त्याची ड्युटी लावण्यात आली. ३ मार्च रोजी पिपर्डा येथे मानव विकास मिशनच्या बसवर कर्तव्यावर असताना सायंकाळी ५ वाजता कोरोना बाधित असल्याचा अहवाल येताच त्याला परत बोलविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच वाहकांना कर्तव्यावर पाठविले. दोन दिवस प्रामाणिक कर्तव्य बजावल्यानंतर पाॅझिटिव्ह असल्याचे अधिकाऱ्यांना कळताच त्यांना अर्ध्या मार्गातून परत बोलविण्यात आले. मात्र बाधित असताना चक्क दोन दिवस कर्तव्य बजावल्याने शेकडो प्रवासी व महामंडळाचे कर्मचारी संपर्कात आले. महामंडळातील अधिकाऱ्यांच्या बेजाबदारपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांसह, वाहक-चालकांमध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्यांविषयी रोष व्यक्त करण्यात येत आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरु आहे. तपासणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंत कर्तव्यावर पाठवू नये, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत केवळ तीन तासांचा कालावधी तपासणीसाठी देवून त्यानंतर कर्तव्यावर पाठवित आहे.
चिमूर आगारात कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाने १ मार्च रोजी सरकारी दवाखाना चिमूर येथे कोरोना चाचणी केली. मात्र तरीसुद्धा त्याला कर्तव्यावर पाठविण्यात आले. २ मार्च रोजी उरकुटपार या मार्गावर मानव विकास सेवेच्या विद्यार्थ्यांच्या बसवर त्याची ड्युटी लावण्यात आली. ३ मार्च रोजी पिपर्डा येथे मानव विकास मिशनच्या बसवर कर्तव्यावर असताना सायंकाळी ५ वाजता कोरोना बाधित असल्याचा अहवाल येताच त्याला परत बोलविण्यात आले. असाच प्रकार चंद्रपूर येथील वाहकाबाबत घडला. त्यांनी २ मार्च रोजी तपासणी केली. दुसऱ्या दिवशी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यालासुद्धा अर्ध्या मार्गातून परत बोलविले. मात्र प्रवाशादरम्यान तो अनेकांच्या संपर्कात आल्याने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या या प्रकारामुळे जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची भीती आहे.
कर्तव्यावर न गेल्यास गैरहजर
चंद्रपूर येथील एका वाहकाने चंद्रपूर-वणी बसवर कर्तव्य बजावल्यानंतर कोरोना तपासणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची ड्युटी लावण्यात आली. मात्र आपण कोरोना चाचणी केल्यामुळे अहवाल येईपर्यंत एक दिवसाची रजा मंजूर करण्याचा विनंती अर्ज केला. मात्र अधिकाऱ्यांनी चक्क त्याची गैरहजेरी लावल्याची माहिती आहे.
एकदा एका वाहकाची रिपार्ट यायची असल्याने त्याला कामावर पाठवले. मात्र त्याचा रिर्पाट पॉझिटिव्ह आल्याने अनेकजण संक्रमित झाले होते. असा प्रकार घडू नये म्हणून कर्मचाऱ्यांना साप्ताहिक रजेच्या एक दिवसापूर्वी कर्मचाऱ्यांना तपासणी करण्यास पाठवावे, अशी संघटनेची मागणी होती. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अशा प्रकारामुळे जनतेला संक्रमित करण्याचे काम अधिकारी करीत आहेत.
दत्ता बावणे,विभागीय सचिव महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना, चंद्रपूर
याबाबत माहिती मिळाली आहे. दहा-दहा जणांना तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. जोपर्यंत कोरोनाचा अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यांना रजा देण्याच्या निर्णयावर विचार करण्यात येईल.
-सेवकराम हेडाऊ,
प्रभारी वाहतूक निरीक्षक