सीबीएससी बारावी निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:35 AM2019-05-03T00:35:48+5:302019-05-03T00:36:30+5:30
सीबीएससी बारावीचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात हा निकाल १०० टक्के लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सीबीएससी बारावीचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात हा निकाल १०० टक्के लागला.
चंद्रपुरात नारायणा विद्यालय, बीजेएम कॉरमेल अकादमी आदी ठिकाणी बारावी सीबीएससीचा अभ्यासक्रम आहे. याशिवाय केंद्रीय विद्यालय, आयुधनिर्माणी, माणिकड सिमेंट इंग्लिश स्कूल, गडचांदूर, जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बा.) आदी शाळांमध्येदेखील सीबीएससी बारावीचा अभ्यासक्रम आहे. या सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नारायणा विद्यालयाचा नितीन वेल्लीरिंगल याने ९५.४० टक्के गुण घेत प्राविण्य मिळविले आहे. त्यापाठोपाठ नारायणा विद्यालयाचा तेजस चौधरी याने ९४ टक्के तर जवाहर नवोदय विद्यालयाचा ओम नालमवार याने ९३.८० टक्के घेत बारावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळविले.
अनाथ ओमची दु:खावर मात
तळोधी (बा. ) : आई-वडिलांचे छत्र हरविले. अनाथ आयुष्य आणि आर्थिक चणचणही. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जवाहर नवोदय विद्यालयाच्या ओम श्रीराम नालमवार याने बारावी सीबीएससीच्या परीक्षेत ९३.८० टक्के गुण घेऊन इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. ओमची घरची परिस्थिती अत्यंत बिकट. वडील श्रीराम नालमवार यांचा लहानपणीच मृत्यू झाला. आई मागील वर्षी सिलिंडर स्फोटात मरण पावली. यामुळे अनाथ झालेल्या ओमवर दु:खाचे डोंगर कोसळले. मात्र हे दु:ख पचवून ओम बारावी परीक्षेच्या तयारीला लागला. आज लागलेल्या निकालात त्याला ९३.८० टक्के गुण मिळाले. हे प्राविण्य मिळवून ओमने इतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. दरम्यान, प्राचार्य सैबेवार यांनी ओमच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.