राज्यातील सीबीएसईतही वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशाचा निर्णय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:50 PM2020-04-01T17:50:52+5:302020-04-01T17:51:21+5:30
सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारचे मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सीबीएसई शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मागणीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्याची मागणी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे केली होती.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व शाळांमध्ये वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असताना सीबीएसई शाळांनी अशा कोणत्याही सूचना सीबीएसई बोर्डाने दिल्या नसल्याचे सांगून यासाठी नकार दिल्याची बाब पालकांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणली. आ. मुनगंटीवार यांनी त्वरीत मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल व राज्यमंत्री संजय धोत्रे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून सीबीएसई शाळांना स्पष्ट निर्देश देण्याची विनंती केली. संजय धोत्रे यांच्याशी आ. मुनगंटीवार यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असता सीबीएसईद्वारा संचालित राज्यातील शाळांमध्ये वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती आ. मुनगंटीवार यांना दिली आहे. राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्याा पालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.