सीसीएफने सादर केला पीसीसीएफकडे अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 04:42 AM2018-03-02T04:42:33+5:302018-03-02T04:42:33+5:30
‘येडा अण्णा’ वाघाच्या मृत्यूप्रकरणी चंद्रपूर वनवृत्त मुख्य वनसंरक्षकांसह चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवसंरक्षकांनी शुक्रवारी नागपूरला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांच्याकडे आपला अहवाल सादर केल्याची माहिती आहे.
चंद्रपूर : ‘येडा अण्णा’ वाघाच्या मृत्यूप्रकरणी चंद्रपूर वनवृत्त मुख्य वनसंरक्षकांसह चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवसंरक्षकांनी शुक्रवारी नागपूरला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांच्याकडे आपला अहवाल सादर केल्याची माहिती आहे. वनमंत्र्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना (वन बल प्रमुख) चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले होते. मात्र पीसीसीएफ यांनी नागपुरातूनच सूत्रे हलविल्यामुळे या अहवालात वस्तुस्थिती आहे की केवळ औपचारिकता पार पाडली आहे, याकडे वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.
ताडोबा लगतच्या चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली बिटात वेळीच उपचार न झाल्याने जखमी वाघाच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) नागपूर दिले होते. हा अहवाल २८ मार्चपर्यंत सादर करावयाचा होता. या अनुषंगाने शुक्रवारी मुख्य वनसंरक्षकासह चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाच्या उप वनसंरक्षकांनी नागपूर गाठून पीसीसीएफकडे अहवाल सादर केला. याआधारे पीसीसीएफ आपला चौकशी अहवाल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादर करण्यात येणार असल्याचे समजते.
वास्तविक, ही चौकशी पीसीसीएफ (वन बल प्रमुख) यांना करावयाची होती. मात्र चौकशी करण्याच्या आदेशापासून ते चंद्रपुरात आलेच नाही. त्यांनी नागपुरातूच येथील अधिकाºयांना सूचना देऊन एकूणच घटनाक्रमाचा चौकशी अहवाल मुख्यवनसंरक्षक व दोन्ही उपवनसंरक्षकांना मागितल्याची माहिती आहे. या सूचनेवरून आज हा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबीला चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी दुजोरा दिला.